विजय कमळे पाटील, जालना, 27 एप्रिल: कोरोनानं संपूर्ण देशाचंच नव्हे तर संपूर्ण जगाचंच आरोग्य धोक्यात आणलं आहे. पण त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्याही अनेकांचं कंबरडं या आजारानं मोडलं आहे. विशेषतः हातावर पोट असलेल्यांवर तर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जालना जिल्ह्यात अशाच एका छोट्या व्यावसायिकानं थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या (snack seller committed suicide in Jalna) केली आहे. राज्यात सगळीकडं लॉकडाऊनची स्थिती आहे. रस्त्यावर कोणीही नाही त्यामुळं हातावर पोट असलेल्या छोट्या उद्योजकांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर जणू उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक कुचंबणा एवढी वाढली आहे की, आता या छोट्या व्यावसायिकांना थेट मृत्यूलाच कवटाळावं लागतंय. जालन्यात रमेश गुरूभैये नावाच्या एका छोट्या व्यावसायिकानंही आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेत रमेश यांनी आत्महत्या केली आहे. (हे वाचा- ही राष्ट्रीय आणीबाणी, न्यायालय शांत राहू शकत नाही; SC नं केंद्राला फटकारलं ) जिंथ गाडी लावायचे तिथंच आत्महत्या आत्महत्या केलेले रमेश गुरुभैये हे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाश्त्याची गाडी लावत होते. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर त्यांचं घर चालत होतं. गेल्या अनेक वर्षांपासून ते जिल्हाधिकारी कार्यल्यासमोरील मोकळ्या जागेत न्यू लक्ष्मी नाष्टा सेंटर या नावाने हातगाडी चालवत होते. लिंबाच्या झाडाखाली सावलीत ते नाश्ता विक्रीचा व्यवसाय करायचे. पण त्याच झाडाला गळफास घेत रमेश यांनी रात्री उशिरा आत्महत्या केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉककडाऊनमुळं व्यवसाय बंद झाला होता. त्यामुळं रमेश हे आर्थिक संकटात होते आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक कुचंबणेला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे.