मुंबई, 21 नोव्हेंबर : स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या विधानामुळे सुरू झालेला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. या वादात आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी उडी घेतली आहे. तुषार गांधी यांनी सावरकरांबाबत खळबळजनक दावा केला आहे. नथुराम गोडसेला बंदूक पुरवण्यासाठी सावरकरांनी मदत केली, असं ट्वीट तुषार गांधी यांनी केलं आहे. ‘सावरकरांनी फक्त ब्रिटीशांना मदत केली नाही, तर त्यांनी बापूंचा खून करण्यासाठी नथुराम गोडसेला बंदूक मिळवून देण्यासाठीही मदत केली. बापूंचा खून करण्याआधी गोडसेकडे शस्त्रही नव्हतं,’ असं ट्वीट तुषार गांधी यांनी केलं आहे. ‘हे मी म्हणत नाही तर कपूर कमिशनच्या इनक्वायरीमध्ये हे नमूद केलं आहे. 26-27 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे आणि आपटे सावरकरांना भेटायला गेले होते, अशी बातमी पोलिसांकडे होती. तोपर्यंत बंदूक मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ गेले होते. या बैठकीनंतर ते दिल्लीहून ग्वालियरला गेले. ग्वालियरला परचुरे हे सावरकरांचे अनुयायी होते, त्यांच्याकडे गेले. त्यांच्या मदतीने बंदूक मिळाली. हा घटनाक्रम त्यांना बंदूक कुठून मिळाली हे स्पष्ट दाखवतो,’ असं तुषार गांधी म्हणाले आहेत.
‘मी हे काही नवीन सांगितलं नाही. 2007 च्या माझ्या पुस्तकात मी हे लिहिलं आहे. त्याआधी कपूर कमिशनच्या अहवालातही ते आलेलं आहे,’ अशी प्रतिक्रिया तुषार गांधी यांनी दिली. ‘प्रबोधनकार ठाकरे यांनी गांधींना असलेल्या जीवाच्या धोक्याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांना सावध केलं होतं. तसंच सनातनी हिंदूंच्या नेत्यांनाही प्रबोधनकार ठाकरेंनी आता तुम्ही हे बंद करा असं सांगितलं होतं. गांधींना मारायची, त्यांना संपवण्याची मोहीम बस करा, संपवा, असं प्रबोधनकार म्हणाले होते. मी उद्धवजींना भेटलो तेव्हा मी त्यांना हे सांगितलंही होतं. महाराष्ट्रात सनातनी हिंदूंचे नेते कोण होते, याचं नाव घ्यायची गरज नाही,’ असं विधान तुषार गांधी यांनी केलं आहे.