पुणे, 25 एप्रिल : उद्योग क्षेत्रात हल्ली मोठ्या प्रमाणात नवीन उद्योजकांची भर पडत आहे. अनेक जण काहीतरी नवीन आणि त्यातही परवडणाऱ्या दरात मिळतील अशा वस्तूंची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. असाच एक नावीन्यपूर्ण प्रयत्न पुण्यातल्या एका उद्योजकाने (Entrepreneur) केला आहे. पुण्यात राहणारे राहुल पाठक अॅक्वा प्लस (Aqua Plus) नावाची फर्म चालवतात. पूर आणि भूकंप (Floods And Earthquakes) यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत शुद्ध पिण्यायोग्य पाणी त्वरित उपलब्ध व्हावं, यासाठी त्यांनी एक नावीन्यपूर्ण उपाय शोधला आहे. त्यांनी एका अत्याधुनिक वॉटर फिल्टरची निर्मिती केली आहे. या प्रकल्पासाठी त्यांना अमेरिकेतल्या (United States) अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या एडिसन पुरस्कार सोहळ्यात (Edison Awards Ceremony) सन्मानित करण्यात आलं. त्यांना औद्योगिक तंत्रज्ञान श्रेणीतल्या सुवर्ण पुरस्काराने (Gold Prize) गौरविण्यात आलं आहे. याबद्दलचं सविस्तर वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने प्रकाशित केलं आहे. राहुल पाठक यांना या प्रकल्पासाठी गेल्या आठवड्यातच मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाबद्दल राहुल पाठक म्हणाले, “Aqua Plus ने विकसित केलेल्या वॉटर फिल्टरचा उपयोग काही संस्थांद्वारे मदत कार्यादरम्यान केला जातो. रेड क्रॉस (Red Cross), युनिसेफ ऑक्सफॅम जीबी (Unicef Oxfam GB), रेडआर इंडिया (RedR India), इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटीज (International Federation of Red Cross and Red Crescent Societies), इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (International Committee of the Red Cross) आणि रोटरी इंटरनॅशनल (Rotary International) या संस्था अॅक्वा प्लसच्या तंत्रज्ञानाचा वापर करतात." JOB ALERT: पुण्यातील ‘या’ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये विविध पदांसाठी जागा रिक्त; असा लगेच करा अर्ज Aqua Plus ने विकसित केलेला हा वॉटर फिल्टर सर्वप्रथम 2005 च्या जम्मू आणि काश्मीर भूकंपाच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्यात यशस्वीरित्या वापरला गेला. त्या वेळी हे फिल्टर्स 5000 हून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचले. उत्तराखंड, जम्मू, केरळ, आसाम आणि चेन्नईच्या पुरादरम्यान 1500 ठिकाणी हे वॉटर फिल्टर बसवण्यात आले. त्याच्या एका मॉडेलने केवळ 10 तासांत 7000 लिटर पाण्यावर प्रक्रिया केली. त्यामुळे डोंगराळ प्रदेशात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध झालं. ‘अमेरिकेतले महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांचं म्हणणं होतं, की विज्ञानातली संशोधनं ही आर्थिक फायद्याच्या विचाराने नाही, तर माणसाच्या उपयुक्ततेला केंद्रबिंदू मानून झाली पाहिजेत. आमचं संशोधन जगभरातल्या मानवजातीला उपयुक्त असून त्यासाठी एडिसन यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला आहे ही आणखी मोलाची गोष्ट आहे,’ असं सांगून पाठक यांनी पुरस्काराचं महत्त्व सर्वांसमोर मांडलं. ते म्हणाले, “मानव-केंद्रित संसाधनांचा (Human-Centric Resources) विकास करताना पैशाच्या पलीकडे पाहण्यास सुरुवात केली, की तिथेच त्याचा प्रभाव निर्माण व्हायला सुरवात होते. नवीन कल्पना अगदी तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.” पाठक पुढे म्हणाले, “अशा नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे आम्ही आपत्तींमुळे प्रभावित झालेल्या सर्वांत असुरक्षित नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यांना सर्वांत जास्त गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे उपाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 हून अधिक आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरले आहेत. हा पुरस्कार देतानादेखील याचा विचार केला गेला आहे.” कठीण प्रसंगांचा सामना करत असलेल्या नागरिकांसाठी राहुल पाठक यांचा हा नावीन्यपूर्ण प्रकल्प खूपच उपयुक्त आहे. त्यांचा हा प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे.