मुंबई, 20 सप्टेंबर : वादग्रस्त संघटनेनं पुण्याला आपलं केंद्र बनवलं आहे, ही संघटना जालना आणि औरंगाबादमध्ये सदस्य नोंदणी करत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून हा अलर्ट देण्यात आला आहे. ही संघटना अत्यंत गुप्त पद्धतीने आखणी करत आहे, ज्यामुळे संशयास्पद घटनांचा धोका निर्माण झाला आहे. तर एनआयएने अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणी केलेल्या तपासामध्येही काही धक्कादायक खुलासे केले आहेत. एनआयएला या प्रकरणातल्या आरोपींची चौकशी करताना तबलिगी जमात आणि जमियत उलेमा ए हिंद (जेयूएच) या संघटनांची भूमिका असल्याची माहिती मिळाली आहे. या दोन्ही संघटना सध्या संशयास्पद घटनांमध्ये असल्यामुळे एनआयएच्या रडारवर आहेत. परदेशातून मिळतोय पैसा या वादग्रस्त संघटनेची तीन लाख फॅमिली अकाऊंट आहेत. या खात्यांमध्ये फॅमिली मेन्टेनन्सच्या नावाखाली कतार, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबियातून 500 कोटी रुपये आले आहेत, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे. ही रक्कम मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवण्यात आली आहे. या खात्यांपैकी एक लाख खाती संघटनेच्या सदस्यांची तर उरलेली दोन लाख खाती त्यांच्या नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींची आहेत. या खात्यांमध्ये येत असलेल्या पैशांचा वापर कशासाठी होत आहे, याचा तपास एनआयए करत आहे.