नागपूर, 27 मे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला या वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत . जून महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघस्थानी येणार असल्याच्या या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. तृतीय वर्षाचा प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. नागपुरात १४ मेपासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून ७०८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुखर्जी यांनी आमंत्रणाचा स्वीकारदेखील केला आहे. यावेळी मंचावर सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचीदेखील उपस्थिती राहणार असून ते स्वयंसेवकांना उद्बोधन करतील. दरम्यान, संघाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी पत्रिका छापण्यासाठी गेल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण प्रणव मुखर्जी या कार्यकर्माला येतात का हा प्रश्न कायम आहे.