या प्रकरणी तीन जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांच्या टोळक्याने जवळपास 24 वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
जेरबंद केलेल्या तिघांनी मद्यप्राशन करून लोखंडी रॉडने दोन किलोमीटरच्या परिसरात उभ्या असलेल्या सुमारे 24 वाहनांची तोडफोड केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी तोडफोडीचे सत्र बंद होते. मात्र, ते पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात एकूण 24 मोटारी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना आज सकाळी समोर आली.
अद्याप वाहन तोडफोडीचे कारण अस्पष्ट आहे. बुद्ध हौसिंग सोसायटी, प्रियदर्शनी नगर, ममता नगर, संगम नगर, ढोरे नगर अशा दोन किलोमीटरच्या परिसरात वाहनांची तोडफोड केली आहे.
आधीच लॉकडाऊनमुळे नागरिकांना हाताला काम नाही. त्यात सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केल्याचं पाहायला मिळत असल्याने त्यांचे झालेले नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न नागरिक करत आहेत. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.