पालघर, 17 जुलै : गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या विविध घटना समोर येत असताना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 31 वर्षीय तरुण चित्रकला शिक्षक गंगाराम रमेश चौधरी यांनी आपलं स्वतःचे चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून आपल्या फोटोला हार घातला आणि गळफास घेऊन घरातच आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. काही दिवसापासून आपली पत्नी लग्न होऊन 5 वर्ष झाली तरीही वेतन मिळत नाही म्हणून माहेरी निघून गेल्याने गंगाराम विचलित अवस्थेत होता. गंगाराम हा चित्रकलेत पारंगत आणि वारली चित्रकार होता. 8 जून रोजी गंगारामने आपले स्वतःचे चित्र रेखाटले. त्या चित्रावर दि 15-7-2020 बुधवार, असा मृत्यू दिनांक टाकला आणि चित्राला हार घालून त्याचा फोटो काढून त्यांच्या एक आप्तेष्टाला व्हॉट्सअॅपद्वारे फोटो पाठवला. हेही वाचा - पुण्यातील पप्पू पडवळ हत्येप्रकरणी महत्त्वाचा खुलासा, अटकेनंतर आरोपींनी सांगितलं खुनाचं कारण सध्या पाऊस चांगला असल्याने शेतीची काम सुरू आहेत. त्यामुळे काल गंगारामच्या घरातील सर्व माणसं आपल्या भात लावणीच्या कामासाठी शेतीवर निघून गेली होती. दरम्यान गंगाराम एकटाच घरी होता. त्याने घरातच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत विनाअनुदानित शाळेवर चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे लग्न 2016 साली झाले होते. दरम्यान, कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊन काळात नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्येच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. बेरोजगारी, कौटुंबिक कलह यातून जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला जात आहे.