06 आॅक्टोबर : नारायण राणेंनी अखेर एनडीएत प्रवेश केलाय. सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्वतः जाहीर केलं. आता माझं काय करायचं ते मुख्यमंत्री आणि भाजपनं ठरवायचं, असं राणे म्हणाले. पक्षाची अधिकृतरित्या नोंदणी झाल्यावर कार्यकारिणी जाहीर करणार, त्यामध्ये काँग्रेसमधले जुने कार्यकर्ते आणि स्वाभिमान पक्षाचे नवे कार्यकर्तेही असतील, असं राणे म्हणाले. शिवसेनेला माझा विरोध नाही, त्यांचे विचार मला पटत नाहीत. माझ्या पक्षाचा राजकीय शत्रू अजून ठरायचाय, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. मंत्रिपदाबाबत विचारले असता, आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकींत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 27 सरपंच बिनविरोध निवडून आल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.