नाशिक, 29 डिसेंबर : नाशिकच्या तरुणाची तामिळनाडू राज्यातील कल्पक्कम येथे अणुसंशोधन शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. संपूर्ण भारत देशातून फक्त 17 तरुणांची यात निवड करण्यात आली. यात नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील तरुणाने यश संपादन करत बाजी मारली आहे. मयूर गवारी असे या तरुणाचे नाव आहे. मयूर हा वडील एलआयसी अधिकारी व लेखक डॉ. गोपाळ गवारी व डॉ. संगीता गवारी यांचा मुलगा आहे. त्याने आपल्या गुणवत्तेच्या बळावर आपले यश सिद्ध केले. त्याचे शिक्षण आदर्श मराठी शाळा, नाशिकरोड, माध्यमिक पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल नाशिकरोड आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मखमलाबाद येथे झाले आहे. मयूर हा दहावीच्या परिक्षेत तो 95 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाला. यानंतर त्याने अकरावी आणि बारावीचे शिक्षण केटीएचएम महाविद्यालयातून घेतले. बारावीच्या वर्गात त्याला 90 टक्के गुण मिळाले होते. यानंतर त्याने गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतली. तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून एम. टेकचे शिक्षण घेतला. मयूर हा पुण्यात असताना एका निवृत्त प्राचार्याकडे राहत असताना त्याने सुजन कुपन प्रा. लि.कंपनीत त्याने दोन वर्षे नोकरी केली. देशासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे या हेतूने त्याने नोकरी सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करत शास्रज्ञ होण्याचे स्वप्न बाळगले. एप्रिल 2022 मध्ये त्याने यासाठी परीक्षा दिली होती. त्यात त्याची ‘टेक्निकल ऑफिसर ( मेकॅनिकल) म्हणून निवड झाली होती. हेही वाचा - नोकरी सोडली अन् UPSC करण्याचा निर्णय; दोन वेळा अपयश मात्र, थेट IAS पदाला गवसणी दरम्यान, मयूर हा गेल्या 21 डिसेंबर 2022 कल्पक्कम येथे रुजू झाला आहे. मयूरला चित्रकला विषयातही रस असल्याने त्यातही त्याने अनेक बक्षिसे मिळविली आहेत. तर मयूर गवारीच्या यशाबद्दल त्याच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.