नाशिक, 16 जानेवारी : नाशिक शहर मेट्रो सिटीकडे वाटचाल करत असतांना नाशिकचा विकास झपाट्याने होत आहे. यामुळे युवा तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अशातच नाशिकमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुकेश जैन यांच्या मुलाने इंजिनिअर बनत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. युवा सिव्हील इंजिनिअर मयुर जैन यांनी एका कंपनीचे 8 हजार 415 स्क्वेअर फुटचे 105 दिवसांचा कालावधी लागणारे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या 43 दिवसात पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यामध्ये करण्यात आली आहे. संघर्षमय प्रवास युवा इंजिनिअर मयुर जैन यांचे वडील मुकेश जैन हे एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करत होते. अशा बिकट परिस्थितीत मयुर जैन यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. वडिलांना कामात मदत करत त्यांनी सिव्हिल इंजिनिअर तसेच चार्टर्ड इंजिनीअरचे शिक्षण पूर्ण केले.
शहरातील सुविधा गावात, ग्रामीण भागातील शाळेतील वर्ग पाहून म्हणाल क्या बात है! Video
कसे पूर्ण केले बांधकाम? यात पायाभरणी, प्लीथ फिलिंग, प्लीथ कास्टिंग, टाय बीम, पीसीसी, रेनफॉर्समेंट,पीटी स्लॅब कास्टिंग पर्यंतचे पूर्ण काम करण्यात आले आहे. हे सर्व काम सर्व स्टॅंडर्ड मेंटेन करून करण्यात आले आहे. यामध्ये काँक्रीट स्ट्रेंथ सेन्सर लावण्यात आले आहे. ज्याद्वारे मोबाईलवर ॲपद्वारे रियल टाइमिंग मध्ये काँक्रीटची खरी ताकद कळते. या कामाला व्यवस्थित व लवकर पूर्ण व्हावे यासाठी विशेष सेंटरिंग डिझाईन करण्यात आली आहे. बांधकामाला लवकर ताकद मिळावी यासाठी विशेष केमिकलचा उपयोग करण्यात आला आहे तसेच या कामासाठी 50 कामगार दिवस रात्र झटत होते. विशेष म्हणजे 43 दिवस संपल्यानंतर साधारणपणे 25 दिवस लागनारेस्लॅब उघडण्याचे काम फक्त 7 दिवसाच्या आत करण्यात आले असे इंजिनिअर मयुर जैन यांनी सांगितले.
या आधी अनेक विक्रम विश्व प्रसिद्ध मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथे सात मजली 100 रूमची धर्मशाळा, सर्वतोभ्रद महल, संत निवास आदी कामे विक्रमी वेळात पूर्ण केले आहेत. काही महिन्यापूर्वीच मांगीतुंगी येथे झालेल्या महामस्तक अभिषेक सोहळ्यात फक्त 10 दिवसात 1800 स्क्वेअर फुटचे बांधकाम सहित 12 फूट उंच भगवंताची वेदी तयार करण्यात आली होती. ज्यावर 40 टनाची भगवंतांची प्रतिमा उभी करण्यात आली आहे आणि त्यांच्या या कार्याला बघून 2022 चा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर नाशिक चॅप्टरचा प्रॉमिसिंग इंजिनियर अवॉर्डने त्यांना गौरवण्यात आलं आहे.