नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 22 डिसेंबर : लोकांच्या सुखदुःखात बँड वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या बँड वादकाचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाग्य उजळलं आहे. गावातील ग्रामस्थांनी आपल्या सुखदुःखात बँड वाजवणाऱ्या बँड वादकाच्या हातात गावातील सत्ता देत त्याला सरपंचपदी विराजमान केले आहे. कुणाला दिला पाठिंबा - जळगाव जिल्ह्यातील अंतुर्ली खुर्द येथील बँडवादक कांतीलाल सोनवणे यांनी पहिल्यांदाच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभे राहून ही निवडणूक जिंकली आणि ते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपला पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला दिला आहे. तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याचा प्रण त्यांनी घेतला आहे. अंतुर्ली खुर्द ग्रामपंचायतीत आठ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत गावातील गौरव पाटील यांच्यासह तरुणांनी एकत्र येत परिवर्तन पॅनलची स्थापना केली. तसेच या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून बँडवादक कांतीलाल सोनवणे यांनी सरपंचपदासाठी तर गावातील इतर तरुणांनी सदस्य पदासाठी उमेदवारी दाखल केली. या निवडणुकीत बँड वादक कांतीलाल सोनवणे यांच्या परिवर्तन पॅनलने सरपंचासह सदस्यपदाच्या आठही जागेवर विजय मिळवला आणि प्रस्थापितांना देखील धक्का दिला. हेही वाचा - 22 वर्षांची तरुणीची कमाल, जळगाव जिल्ह्यातील शुभांगीची सरपंच पदाला गवसणी, जोरदार चर्चा विजयानंतर शिंदे गटात सहभागी होऊन मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील व किशोर पाटील यांच्या नेतृत्वात गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रण परिवर्तन पॅनलने घेतला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या माध्यमातून जनशक्ती व धनशक्ती, असे सर्व प्रयोग उमेदवाराकडून राबवले जातात. मात्र, कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या व अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील बँड वादक कांतीलाल सोनवणे व त्यांचे परिवर्तन पॅनल हे विजयी झाल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात मात्र बँड वादक सरपंचाची चर्चा रंगली आहे.