सुनिल दवंगे/ शिर्डी, 11 ऑगस्ट : फकिर अवस्थेत आणि अत्यंत साधेपणाने जीवन व्यक्तीत करणा-या साईबाबांच्या दरबारी सोने दान करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. गेल्या महिनाभरात सुवर्ण मुकूट, सोन्याची बासरी, साईमूर्तीचा चौथरा अशा सोन्याच्या वस्तू बाबांना भेट म्हणून दिल्या जात आहे. आज ही आंध्रप्रदेश राज्यातील बापटला येथील साईभक्त अन्नम सतीष प्रभाकर यांनी तब्बल 45 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकूट बाबांना अर्पण केला आहे. धूपारतीच्या वेळी हा मुकूट साईमुर्तीला चढवण्यात आला असून वीस वर्षाचे स्वप्न पूर्ण झाल्याचं दानशूर भाविकानं आनंद व्यक्त केला आहे. आंध्रप्रदेश राज्यातील बापटला येथील साईभक्त अन्नम सतीष प्रभाकर हे साईबाबांचे अत्यंत जूने भक्त आहेत. नेहमीच साईंच्या समाधीचे दर्शन करण्यासाठी ते शिर्डीला येत असतात. वीस वर्षापूर्वी साईबाबांना सोन्याचा मुकूट भेट देण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली होती. गेल्या वीस वर्षापूर्वी साईंना दान करण्याची इच्छा आज त्यांनी पूर्ण केली आहे. आपल्या परिवारासोबत येऊन अत्यंत सुबक कारागिरी केलेला मुकूट त्यांनी बाबांना अर्पण केला आहे. या सोनेरी मुकूटाचे वजन 770 ग्रॅम असून त्याची किमंत 45 लाख रुपये असल्याचं भाविक अन्नम सतीष प्रभाकर यांनी सांगितले.
शिर्डीच्या साईबाबांसाठी सोन्याची बासरी; दिल्लीतील कुटुंबाने या भेटीमागील सांगितलं अनोखं कारण
सोन्याच्या मुकुटाबरोबरच 620 ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट बाबांना देणगी स्वरुपात दिले आहे. हे सर्व दान संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी स्विकारले आहे. साईबाबा संस्थानने निव्वळ धातूचे वजन करत असते. आलेले 770 ग्रॅम सोन्याची किमंत 36 लाख 98 हजार 310 रुपये दान स्वरुपात जमा केली आहे. चांदीच्या ताटाची किंमत 33 हजार 480 रुपये जमा करण्यात आली आहे. सोने-चांदीचे दान स्विकारताना साईट्रस्ट टाकसाळकडून मुल्यांकन करुन घेते. यात कारागिरी, मजूरी, इतर टॅक्स वजा करुन दान स्विकारलं जातं. त्यामुळे भाविकांच्या किंमतीत आणि साईसंस्थानच्या आकड्यात फरक जाणवत असतो. यावेळी बोलताना दानशूर भाविकाने साईंच्या चरणी आपली इच्छा पूर्ण झाल्याने समाधान मिळाल्याचं म्हटलं आहे. साई बाबांना एका हातानं दान दिलं तर बाबा हजारो हाताने आशीर्वाद देतात. आपल्याकडील जे काही आहे ते बाबांच्या आशीर्वादनेच असून वीस वर्षापूर्वी व्यक्त केलेली इच्छा साईबाबांनीच पुर्ण करुन घेतल्याच यावेळी सांगीतले आहे.