Super Tigress Mom News: मध्य प्रदेशात वाघांची संख्या वाढवणाऱ्या T-15 कॉलर वाघिणीचा मृत्यू झाला. ‘सुपर टायग्रेस मॉम’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील या वाघिणीला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देण्यात आला. तिच्या अंत्यसंस्कारात राखीव दलाच्या अधिकाऱ्यांसह अनेकजण सहभागी झाले होते.
भारतातील 'सुपर टायग्रेस मॉम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेंच अभयारण्यातील 'कॉलरवाली' वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. या वाघिणीने तिच्या आयुष्यात एकूण 29 पिलांना जन्म दिला. त्यातली 25 पिल्ले म्हणजेच बछडे जगले.
'कॉलरवाली' 16 वर्षांची होती, साधारणपणे वाघ 12 वर्षे जगतात. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार तिचे अंतिम विधी करण्यात आले, हे पाहताना अनेकांचे डोळे नकळत पाणावतांना दिसत होते.
या घटनेने मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात शोककळा पसरली आहे. तिला T-15 'कॉलर' वाघीण असेही म्हटले जाते.
ही वाघीण गेल्या चार दिवसांपासून आजारी होती. तिच्या निधनाची बातमी तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचताच त्यांना धक्काच बसला. त्यानंतर तिला आदरपूर्वक निरोप देण्यात आला.
8 वेळा 29 बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम या वाघिणीच्या नावावर आहे. एवढेच नाही तर पेंच व्याघ्र प्रकल्पात आणि संपूर्ण राज्यात वाघांची संख्या वाढवण्यात या वाघिणीचे महत्त्वाचे योगदान आहे.
वन्यजीवांमध्ये स्वारस्य असलेले देशातील आणि जगातील बरेच लोक तिला टी-15 'कॉलर' वाघिणी म्हणून ओळखतात. तिचा शेवटचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये ती खूपच कमकुवत दिसत आहे.