ठाणे, 8 सप्टेंबर : मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या तुफान पावसामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. चाकरमानी घरी परतत असताना सुरू झालेल्या तुफान पावसामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला. काही तासात मुंबई-ठाण्यात इतका पाऊस पडला की, रेल्वे मार्ग विस्कळीत झालं. ठाणे जिल्ह्यात आज सायंकाळी ५.४५ ते ६.१५ या अर्ध्या तासात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. तर रात्री ८.३० पर्यंत एकूण ७८ मिमी एवढा पाऊस झाला आहे. रात्री ९.३० वाजता ठाणे स्टेशनवर पोहोचलेली डोंबिवली एसी लोकल ४-५ मिनिटे उभीच राहिली होती. ठाणे स्थानकावर खूप गर्दी असल्याने एसी लोकलमध्ये चढलेले प्रवासी दरवाज्यातच उभे राहिले.
परिणामी एसी लोकल पुढे जावू शकली नाही. लोकांनी आरडा ओरडा केल्यानंतर धक्काबुक्की झाली आणि दरवाजातून लोकांना बाजूला केले गेले. तेव्हा एसी ट्रेनचे दरवाजे बंद झाले. या सगळ्यात ४-५ मिनिटे रेल्वे स्थानकावरच मोठी गर्दी झाली होती.
त्या रेल्वे रूळावर पाणी जमा झाल्याने लोकल सेवा धीम्या गतीने सुरू होती. काही लोकल तर 25 ते 30 मिनिटाने उशिराने धावत होत्या.