मुंबई, 10 नोव्हेंबर : सीआयडी मालिकेत तुम्ही अनेकदा स्केच आर्टिस्टला पाहिलं असेल, पण आज भेटूया एका खऱ्याखुऱ्या स्केच आर्टिस्टला. नितीन महादेव यादव असं हे या स्केच आर्टिस्टचे नाव आहे. नितीन यादव हे गेल्या 30 वर्षांपासून पोलिसांसाठी गुन्हेगारांचे स्केच काढून देण्याचं काम करत आहेत. त्यांनी आजवर काढलेल्या 5 हजार स्केचेस मधून तब्बल 450 स्केचेसच्या आधारे गुन्हेगारांना यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊया पोलीस खात्याचा अविभाज्य भाग असलेल्या नितीन महादेव यादव यांच्याबद्दल. एक रुपयाही न घेता पोलिसांसाठी गुन्हेगारांचे स्केच काढतात कुर्ल्याच्या साबळे चाळीत राहणारे नितीन यादव हे कुर्ल्यात गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाची लिस्ट जर बघितली तर त्यांची कर्तबगारी पोलिसांपेक्षा कमी नाही. गेल्या 30 वर्षांपासून ते एक रुपयाही न घेता पोलिसांसाठी गुन्हेगारांची चित्रे काढत आहेत. या कामात त्यांचा हातांना विलक्षण देणगी लाभली आहे. नितीन यादव यांचा प्रवासाला सुरुवात झाली ती त्यांच्या लहानपणी. कामगारांच्या ज्या संपाने मुंबईचा चेहरामोहरा बदलला त्याचा मोठा फटका हा नितीन यादव यांच्या कुटुंबाला बसला होता. पोटापाण्यासाठी ते नंबर प्लेट्स, बॅनर, इत्यादी रंगवण्याचं काम करायचे.
कोकणी संस्कृतीसाठी सोडली नोकरी, सातासमुद्रापार पोहचली शैलेशची कीर्ती, VIDEO
अशी झाली स्केच काढायला सुरुवात एकेदिवशी पोलीस स्टेशन मध्ये ते चौकीचा बोर्ड आणि नावाच्या पाट्या रंगवत होते. त्याचवेळी पोलीस स्टेशन मध्ये एक केस आली. कुर्ल्यातील प्रसिध्द GSK हॉटेल मध्ये हत्या झाली होती. हॉटेलच्या वेटरनेच फक्त चहा देताना गुन्हेगाराचा चेहरा पाहिला होता. नितीन यादव पोलिसांकडे गेले आणि त्यांनी म्हटलं, ‘जर तुम्ही वेटरला बोलतं केलं तर मी त्याच्या वर्णनावरून खुन्याचं चित्र काढू शकतो.’ पोलिसांनी मंजुरी दिली. नितीन यादव यांच्या स्केचच्या आधारे गुन्हेगार केवळ 48 तासात पकडला गेला. लहान वयात त्यांच्या हातांनीच त्यांचा पुढचा मार्ग शोधला होता. या कर्तबगारीनंतर त्यांचा प्रवास सुरु झाला. आजवर अनेक महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपास कामात त्यांनी मदत केली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर 2013 चं शक्तीमील बलात्कार प्रकरण, पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, आणि नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण अशा महत्वाच्या केसेस मध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.
झोपडी ते ताज पॅलेस : ‘मला पैसे नकोत तर…’ कोळीवाड्यातील तरूणाने जिंकलं टाटांचं मन, Video
ज्यावेळी 26/11 चा आतंकवादी हल्ला झाला होता त्यावेळी कामा रूग्णालयात झालेली फायरिंगची ॲक्शन चित्र कोर्टात सादर करण्यात आली. अजमल कसाबवर खटला चालू होता तेव्हा फोटोग्राफर्सना कोर्टात येण्यास बंदी होती. एका पत्रकाराने त्यांना गाठून त्यांना कोर्टरूमचं वर्णन ऐकवलं. या वर्णनावरून त्यांनी कोर्टरूम मधला हुबेहूब प्रसंग चितारला होता. हे स्केच वर्तमानपत्रातही छापून आलं होतं. मुंबई पोलीस खाते व शैक्षणिक खात्याचे मिळून 164 पुरस्कार नितीन यादव यांच्या कामाचा खरा कस लागतो तो संवेदनशील प्रकरणांमध्ये. बलात्कार पिडीत मुलीकडून गुन्हेगाराची माहिती काढून घेणे हा काहीसा क्रूर पण अपरिहार्य भाग असतो. अशा केसेस मध्येही नितीन यादव यांनी सफाईने माहिती काढून घेतली आहे. त्यांच्या कामासाठी त्यांना मुंबई पोलीस खाते व शैक्षणिक खात्याचे मिळून 164 पुरस्कार मिळाले आहेत.
Video: लॉकडाऊनमध्ये दिसला दगड आणि बदललं आयुष्य, मुंबईकर तरूण झाला देशभर फेमस
पोलिसांना मदत करण्यासोबत ते चेंबूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. पोलीस खात्याशी निगडीत सगळ्यांनाच जीवे मारण्याची धमकी ही येतेच. याला नितीन यादवही अपवाद नाहीत. पण कोणताही अडथळा त्यांना त्यांच्याकामापासून लांब ठेवू शकला नाही. 30 वर्षांपासून त्यांनी कामासाठी एक रुपयाही घेतलेला नाही.बलात्काराच्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांची एक अट असते. एकदा का गुन्हेगार पकडला गेला की ते त्याला एक सणकून कानाखाली देणार त्यांची ही अट पोलिसांनी चक्क मान्यही केली आहे, असं नितीन यादव सांगतात.