मुंबई, पुण्याचा पॉझिटिव्हीटी दर कमी झाला आहे. त्यामुळे सरकारच्या अनलॉकच्या नियमांनुसार या दोन्ही शहरातील काही नियम शिथील होणार आहेत.
राज्यातील कोविड रुग्णसंख्या कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या लक्षात घेऊन पाच टप्प्यांत निर्बंध हटवण्यात येत आहे.
राज्य सरकारमार्फत प्रत्येक आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातील आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या जारी केली जाते आणि त्यानुसार जिल्हा प्रशासन निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय घेतं.
पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध आणखी शिथिल होतील अशी अपेक्षा पुणेकरांना होती.
पण पुणे महानगरपालिकेने 18 जून रोजी नव्याने काढलेल्या आदेशात पुणेकरांना वाढीव दिलासा मिळालेला दिसत नाही आहे.
शनिवार - रविवार इतर दुकाने, हॉटेल्स, मॉल्स ब्युटी पार्लर, स्पा खुली राहतील ही पुणेकरांची अपेक्षा फोल ठरली आहे.
नाट्यगृहे, चित्रपटगृह सुरू करण्याबाबत सुधारित आदेशात उल्लेख नाहीये. त्यामुळे पुणेकरांची काहीशी निराशा झाली आहे.
5 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेतील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार.
11 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवांमधील नमूद दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, शनिवार आणि रविवार बंद राहणार.
रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे शनिवार आणि रविवारी फक्त पार्सल सेवा/घरपोच सेवेसाठी रात्री 11 पर्यंत सुरू राहणार आहेत.
कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस सुरू राहतील.
मुंबईचा पॉझिटिव्ही रेट पाच टक्क्यांच्या खाली आहे. मुंबईचा समावेश आता पहिल्या स्तरात झाला आहे. पहिल्या स्तरातील परिसरात सर्व निर्बंध हटवण्यात येतात. त्यामुळे मुंबईकरांना मोकळा श्वास मिळण्याची अपेक्षा होती.
मुंबई जरी लेवल 1 मध्ये आली असली तरी निर्बंध मात्र सध्याचेच लेवल तीनचेच राहतील, असं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.
पुढील आठवड्यात कोणते निर्बंध राहतील याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ. सर्व गोष्टींचा विचार करून टप्याटप्याने निर्बंध दूर केले जातील.