मुंबई, 13 सप्टेंबर: बंगालच्या उपसगारात (bay of bengal) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झालं आहे. आता ते आणखी तीव्र झालं आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy rainFall) पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असणार आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच घाट भागातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या तीन ते चार दिवसांत या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही पुढील काही तासांत पाऊस झोडपणार आहे.
आजपासून बुधवारपर्यंत अतिमुसळधार पाऊस भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी म्हणजेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 15 सप्टेंबरला पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. 16 सप्टेंबरला मात्र पावसाचा जोर काहीशा प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.