मुंबई, 19 ऑगस्ट : मुंबईमध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडी (Dahi Handi Mumbai) साजरी करण्यात येत आहे. मागची दोन वर्ष कोरोनामुळे दहीहंडी साजरी करण्यावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादण्यात आले होते, पण यावर्षी कोरोनाचं प्रमाण कमी असल्यामुळे आयोजक आणि गोविंदा (Govinda) पथकांमध्ये उत्साह दिसत आहे. त्यातच काही महिन्यांवर महापालिका निवडणुका येऊन ठेपल्यामुळे दहीहंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन होत आहे. मुंबईमध्ये दहीहंडीचे थर रचताना काही गोविंदाही जखमी (Govinda Injured) झाले आहेत, याबाबतची माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 24 गोविंदांना दुखापत झाली, यातल्या 19 जणांना उपचार करून सोडून देण्यात आलं आहे, तर 5 जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या कोणत्याही गोविंदाची प्रकृती गंभीर नाही. जखमी झालेल्या गोविंदांपैकी जेजे रुग्णालयात 2, नायर रुग्णालयात 5, केईएममध्ये 9, ट्रॉमा रुग्णालयात 1, कुपर रुग्णालयात 2, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवलीमध्ये 1, पोद्दार रुग्णालयात 4 गोविंदांवर उपचार करण्यात आले. दुपारी 3 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. गोविंदांना मदत दहीहंडीमध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना विमा कवचही मिळणार आहे. दुर्देवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये आणि हात-पाय मोडला किंवा फॅक्चर झाला तर पाच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.