मुंबई, 22 फेब्रुवारी : ‘15 करोड है पर 100 पर भारी है,’ असं वादग्रस्त विधान करणारे MIM चे नेते वारीस पठाण यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. तसंच फक्त 100 लोक या देशात असे आहेत की जे मुस्लीम समाजाविरोधात आहेत, अशा भाजप, आरएसएस, बजरंग दल या संघटनांच्या 100 लोकांविरोधात मी ते वक्तव्य केलं होतं,’ अशी सारवासारव वारीस पठाण यांनी केलं होतं. ‘मी माझे शब्द परत घेतोय, मी देशाचा सच्चा नागरिक आहे. मी सच्चा भारतीय मुस्लीम असून या महान देशावर माझं प्रेम आहे. मुस्लिमांचा संविधानावर विश्वास आहे,’ असं वारिस पठाण म्हणाले. पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले असले तरीही या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. काय म्हणाले होते वारीस पठाण? गुलबर्गा येथील एका सभेत एमआयएमचे वारीस पठाण यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. ‘100 कोटी हिंदू जनतेवर 15 कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर ते मिळवावं लागले’ असं विधान त्यांनी केलं होतं. यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी वारीस पठाण यांच्याविरोधात कारवाई केली. वारीस पठाणला मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. जोपर्यंत पक्षाकडून परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मीडियाशी बोलता येणार नसल्याचं ओवेसींनी म्हटले होतं. वारीस पठाणचा शिरच्छेद करणाऱ्यास 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणा वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात वारीस पठाण यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता तर हक-ए-हिंदुस्तान मोर्चा या मुस्लीम संघटनेने त्यांच्याविरोधात घोषणा केली आहे. वारीस पठाण याचा शिरच्छेद करा, हे करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा या मुस्लीम संघटनेने केली आहे. यावेळी मुजफ्फरपूर येथील कंपनी बाग रोडवर मुस्लीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारीस पठाण याचा पुतळाही जाळला. हक-ए-हिंदुस्तान या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी वारीण पठाणला देशद्रोही म्हटलं आहे.