नागपूर, 24 एप्रिल : कोरोनाच्या संकटामुळे विविध क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असून खेळाडूंच्या दैनंदिन सरावातही व्यत्यय आला आहे. कोरोनाच्या कचाट्यातून त्यांचं वैयक्तिक आयुष्यही सुटू शकलं नाही. लॉकडाऊनमुळे विदर्भाच्या तीन युवा क्रिकेटपटूंना आपले लग्न अनिश्चित काळासाठी पुढं ढकलावं लागलं आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तिघही आपल्या नव्या इनिंगसाठी सज्ज होतील. या तीन खेळाडूंमध्ये अष्टपैलू आदित्य सरवटे, यष्टीरक्षक-फलंदाज अक्षय वाडकर आणि वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी यांचा समावेश आहे. या तिघांनी विदर्भ संघाला सलग दोनदा रणजी आणि इराणी करंडक चॅम्पियनशिपचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला, हे विशेष. आदित्यचा लग्नसोहळा 27एप्रिलला ठरला होता. तर अक्षय वाडकर आणि गुरबानी यांचे लग्न क्रमश: 2 मे आणि 18 मे रोजी ठरले होते. विदर्भाचा क्रिकेट सीझन नुकताच संपला. त्यामुळे सरवटे, वाडकर आणि गुरबानी परिवाराने त्यांच्या क्रिकेटर मुलांचे विवाह निश्चित करून या उन्हाळ्यात लग्नाचा बार उडवून टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाने तिन्ही परिवाराच्या आशेवर पाणी फेरले. ‘लॉकडाऊन’मुळे जमावबंदी असल्याने प्रशासनाने शहरातील सर्व विवाहसोहळे रद्द करण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नाईलाजाने क्रिकेटपटूंनाही आपापले लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले. अक्षय वाडकर आणि त्याची भावी वधू श्रुतिका यांना स्वत:चा विवाह सोहळा अविस्मरणीय बनवायचा आहे. त्यांनी त्यादृष्टीने धूमधडाका करण्याचा विचार सुरू केला होता. मात्र, आता भविष्यातील योजना आखण्याशिवाय पर्याय नाही. नव्या तारखेसाठी प्रतीक्षा सुरू आहे. शिवानी हिच्यासोबत विवाह बंधनात अडकणार असलेला वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीने विवाहाच्या नव्या तारखेबाबत मात्र ‘वेट अॅन्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. वडील नरेश गुरबानी यांच्यानुसार नव्या तारखेचा निर्णय लवकरच होईल. घरच्या थोर मंडळींचा सल्ला घेतल्यानंतर लग्न कधी आटोपायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. विदर्भाचा लेगस्पिनर आणि अष्टपैलू क्रिकेटपटू आदित्य सरवटेचे लग्न मध्यप्रदेश येथील अरुणिता मुरोतिया हिच्याशी ठरले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. येत्या 27 एप्रिलला लक्ष्मीनगर येथील अशोका हॉटेलमध्ये विवाह सोहळा होणार होता. ‘लॉकडाऊन’मुळे सोहळा स्थगित करण्यात आला आहे. नागपूरात कोरोनाचा फटका अनेकांना बसला आहे. क्रीडाविश्व ठप्प झाले. खेळाडूंचा सराव बंद असून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अडथळे येत आहेत. कोरोनाने ऑस्ट्रेलियाच्या सात क्रिकेटपटूंच्या ‘लग्नात विघ्न’ आणल्याचे वृत्त काही दिवसांआधी प्रकाशित झाले होते. आता विदर्भाच्या तीन क्रिकेटपटूंचे शुभमंगलदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडले आहे. संपादन - अक्षय शितोळे