पिंपरी चिंचवड, 7 एप्रिल : जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचं संकट भारतावरही घोंघावत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र या लॉकडाऊनचाही काही समाजकंटकांकडून गैरवापर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबतच पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्वीट करत लोकांना जागृत केलं आहे. ‘लॉकडाऊनच्या काळात अल्कोहोलच्या विक्रीसंदर्भात फेसबुकवर जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. या जाहिराती खोट्या आहेत. एखाद्या विशिष्ट बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले जाते आणि पीडित व्यक्तीस नंतर ब्लॉक केले जाते.बँक तपशील किंवा आर्थिक व्यवहार सामायिक करू नका,’ असं आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलं आहे. ऑनलाईन दारू विक्रीच्या जाहीरातींतून फसवणूक झाल्याच्या सायबर आणि एक्साईज विभागाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या.
लॉकडाऊनमध्ये दारू विकणाऱ्यांवर छापे पुणे जिल्ह्यात 16 लाखांची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. भोर, दौंड, जुन्नर, नारायणपूर सारख्या भागात उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकले. यामध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टींवर कारवाई करण्यात आली. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी माहिती दिली आहे. मद्यविक्री बंद असल्याने अवैध हातभट्टीचे प्रमाण वाढले होते.