उस्मानाबाद, 30 एप्रिल: कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रसार झाल्यापासून जगभरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत अनेकांचे संसार उद्धवस्त केले आहेत. आपल्या जीवाभावाच्या माणसांनी मध्येच साथ सोडल्यानं अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अनेक कुटुंबं पोरकी झाली आहेत, काहींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरवल्यानं एका क्षणांत मुलं अनाथ झाली आहेत. अशा स्थितीत उस्मानाबादमध्ये एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू (Corona patient death) झाल्यानंतर तिच्या नवऱ्यानेही अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने आपले प्राण सोडले आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना महाराष्ट्रातील उस्मानाबाद याठिकाणी घडली आहे. येथील एका दाम्पत्याला कसल्यातरी अल्पशा आजारानं ग्रासलं होतं. अशातच 15 दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात सुमारे पंधरा दिवस सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर बुधवारचा दिवस त्यांच्यासाठी अखेरचा दिवस ठरला आहे. बुधवारी सायंकाळी अचानक या दाम्पत्याचं निधन झालं आहे. बुधवारी सायंकाळी पत्नीचं निधन झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच पतीनंही आपला प्राण सोडला आहे. त्यामुळे दोघांवरही एकाच दिवशी अत्यंसंस्कार करावे लागले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या दाम्पत्याचा मुलालाही कोरोनाचा संसर्ग झाला असून तोही रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे त्याला आई वडिलांच्या अत्यंसंस्कारालाही जाता आलं नाही. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा- मुलाचं निधन झाल्याचं कळताचं मातेनं सोडला प्राण; उस्मानाबादमधील हृदयद्रावक घटना मागील काही दिवसांपासून उस्मानाबाद शहरासोबतचं ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं होतं आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनावर पडत आहे. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.