प्रतिकात्मक फोटो
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 9 सप्टेंबर : राज्यात यावर्षी गणेशोत्सवाचा उत्सव संपूर्ण उत्साहात पार पडला. यानंतर आज लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात येत आहे. यातच आता जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या पित्यासह मुलावर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत दोन्ही बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना चाळीसगाव तालुक्यातील न्हावे गावात आज दुपारच्या सुमारास घडली. तर या घटनेत सुदैवाने महिला बचावल्या आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आबा शिवाजी चव्हाण असे मृत वडिलांचे तर दीपक आबा चव्हाण असे मृत मुलाचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील न्हावे गावातील आबा शिवाजी चव्हाण हे वरील ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. त्यांची न्हावे शिवारात शेतजमीन आहे. त्यात यंदा कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी आबा चव्हाण, पत्नी व मुलगा दीपक आबा चव्हाण हे शेतातील कापसाला खत घालण्यासाठी गेलेले होते. त्यात दुपारी 2 वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामुळे पावसापासून बचाव व्हावा यासाठी तिघेजणे शेतातल्या शेवगाच्या झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत आबा चव्हाण आणि मुलगा दिपक आबा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत महिला थोडक्यात सुदैवाने बचावल्या आहे. या घटनेने चाळीसगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा - Reels बनवणं तरुणांना पडलं महागात, व्हिडीओ काढताना केली अशी गोष्ट, आता जावं लागणार तुरुंगात तसेच या घटनेनंतर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मृताच्या पश्च्यात पत्नी, मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे न्हावे गावात शोककळा पसरली आहे.