ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 5 फेब्रुवारी : सीरियल सुसाईडमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाकरे गावात दीड महिन्यात चार युवकांनी आत्महत्या केल्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे. मोबाईल आणि अंधश्रद्धेच्या एँगलने या प्रकरणाचं गूढ वाढत चाललं आहे. गावात लागलेल्या श्रद्धांजलीच्या बॅनर्सनं गावकऱ्यांचा थरकाप उडतो आहे. गावातल्या 22 ते 27 या वयातल्या चार तरुणांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे गावात भीती पसरली आहे. भीतीमुळे गावातल्या रस्त्यांवरची वर्दळही कमी झाली आहे. दीड महिन्यात तिघांनी विष प्राशन केलं तर एकाने गळफास घेतला. 9 डिसेंबर 2022 ला युवराज पोवारने आत्महत्या केली. चारच दिवसांनी म्हणजेच 13 डिसेंबर 2022 ला शुभम पोवारने जीवन संपवलं. 17 जानेवारी 2023 ला नितीन मोरेनं जीवनप्रवास थांबवला, तर 31 जानेवारी 2023 ला विशाल कांबळेनं आत्महत्या केली. गावातल्या या चार आत्महत्यांचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही, मात्र या चारही आत्महत्यांमध्ये एक समान धागा पाहायला मिळतो आहे. या चौघांनीही आत्महत्येच्या आधी मोबाईल फॉरमॅट केले होते. पोलिसांनी या चारही आत्महत्यांचा तपास सुरू केला आहे. भीती कमी व्हावी, यासाठी गावकऱ्यांचं पोलिसांकडून प्रबोधन सुरू करण्यात आलं आहे. पोलिसांनी गावामध्ये कोपरा सभाही घेतली. यामागे कोणती अफवा अथवा दुसरा काही प्रकार आहे का? याबाबत गावकऱ्यांशी चर्चा केली आहे, यामध्ये अंधश्रद्धेचा प्रकार आढळून आलेला नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. नोकरी, प्रेमभंग यातून नैराश्य आल्यामुळे काही युवक आत्महत्येचा चुकीचा मार्ग निवडतात, त्यामुळे पालकांनीही मुलांशी सुसंवाद साधणं गरजेचं आहे. तसंच तरुणांनीही समुपदेशन करून घेण्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात नेमकं काय सत्य समोर येतं? याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मोबाईल आणि आत्महत्यांचा काही संबंध आहे का? हा पोलीस तपासातला मुख्य भाग आहे.