Jalna Logistics Park
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं, यामुळे विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. यानंतर आता केंद्रातल्या मोदी सरकारकडून मराठवाडा आणि विदर्भाला मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. भारत माला प्रकल्पाअंतर्गत लॉजिस्टिक पार्क तयार करण्यासंदर्भातला करार आज करण्यात आला आहे. या लॉजिस्टिक पार्कमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. हा लॉजिस्टिक पार्क जालन्यामध्ये तयार होत आहे. या लॉजिस्टिक पार्कमुळे इतर भागातील उद्योगासोबत संबंध तयार होतील, तसंच मुंबईला जाऊन कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्तता आता जालन्यातच पूर्ण होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालन्यातला लॉजिस्टिकचा हा प्रकल्प 450 कोटींचा आहे. डिसेंबर 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचंही रावसाहेब दानवे म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत जालना येथील मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्कसाठी एनएचएलएमएल आणि जेएनपीए यांच्यात आज करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
भारत माला प्रोजेक्टच्या अंतर्गत भारतात 35 ठिकाणी मल्टीमोडल लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येणार आहेत. या प्रोजेक्टमध्ये जालन्याचाही समावेश करण्यात आला आहे. जालन्यातल्या या पार्कमुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या उद्योगाच्या मालाची वाहतूक जलद गतीने आणि कमी पैशांमध्ये होणार आहे. या प्रकल्पामुळे जालना आणि औरंगाबाद यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हे ,तसेच बुलढाणा भागातील व्यापार उद्योगमालाची वाहतूक वेगवान आणि कमी खर्चात होईल. औद्योगिक वसाहतीतील सर्व परिसर जोडण्यासाठी जालना महत्त्वपूर्ण केंद्र निर्माण होत असून यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते, रेल्वे मार्ग, दळणवळण, गोदामे, उद्योगातील कच्चा, पक्का माल साठा करून ठेवण्यासाठी मोठी गोदामे,शीतगृहे,कस्टम क्लिअरन्सची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून या संदर्भात आजचा हा सामंजस्य करार राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.