सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 17 फेब्रुवारी : औरंगाबादेत आज शिवजयंतीच्या निमित्तानं एक वेगळा धार्मिक सलोखा पहायला मिळाला. भल्या सकाळीच शहरातील क्रांतीचौकात मुस्लिम विद्यार्थ्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुस्तक बघून नागरिकांना कुतूहल निर्माण झालं. नेमकं औरंगाबादेत आजपर्यंत कधी घडलं नाही ते काय घडलं पाहू या. हिंदूओं को हमारी ओर से शिवजयंती मुबारक निष्पाप मुस्लिम विद्यार्थिनी. त्यांना शिवाजी महाराजांच्या नावानं चालणाऱ्या गलिच्छ राजकारणाचा काहीच गंध नाही. त्यांच्या हातात छत्रपतींचे चरित्र पुस्तक आहे आणि त्यांनी ते वाचले. आता त्यांना कळतंय छत्रपती शिवाजी महाराज हे निधर्मी जाणता राजा होते. त्यांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन आदर्श राज्य निर्माण केलं. त्यांनी कधी जातीभेद केला नाही. शिवाजी महाराजांचा लढा मुस्लिमांविरोधात नाही तर जुलमी सत्तेच्या विरोधात होता. औरंगाबादेत शिवजयंती निमित्त जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी. सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना घेऊन छत्रपती चरित्र पारायण सोहळा झाला. या सोहळ्यात मुस्लिम विद्यार्थ्यांसह सर्व जातीचे विद्यार्थी सामील झाले. मुस्लिम मुला मुलींच्या हातात शिवाजी महाराजांचे चरित्र, हे चित्र आपल्याला वेगळा भविष्याचा अर्थ सांगून जातंय. महाराजांच्या नावानं गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना हा इशारा आहे. येणारी पिढी आता बदलते आहे. धार्मिक सलोख्याचं हे चित्र औरंगाबादेतलं असलं तरी राज्यातील, देशातील बहुतांश भारतीयांच्या मनात हा सलोखा आहेच.म्हणूनच आपण भारतीय आहोत. फक्त एकच खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल, ही निष्पाप पिढी कुणाच्याही गलिच्छ विचाराला बळी पडता कामा नये.