मुंबई, 7 जुलै: मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. गेल्या २२ महिन्यांत कुलगुरूंनी तब्बल १११ कोटींच्या ‘ठेवी’ अर्थात फिक्स डिपॉडिट्स मुदत संपण्यापूर्वीच मोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठाला आर्थिक चणचण भासत असल्याने या ठेवी मोडण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. विद्यापीठाने २० नोव्हेंबर २०१५ पासून २८ एप्रिल २०१७ या कालावधीत ११० कोटी ८७ लाख ९० हजार ६६१ रुपये इतकी प्रचंड रक्कम मुदतपूर्वीच वटवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाचे आर्थिक नुकसान झाले आहे. ठेवी अगोदरच वटविल्याने विद्यापीठाला व्याजापोटी ३ कोटी, ५५ लाख, ६ हजार, ६५६ रुपये आणि ४९ पैसे मिळाले. मुदत संपल्यावर ही रक्कम चारपट जास्त मिळाली असती. या संपूर्ण काळात १ कोटींहून अधिक रक्कम अकरावेळा काढल्याची माहितीही उजेडात आली आहे. विद्यापीठाच्या खात्यावर विविध निधींच्या माध्यमातून ५१८ कोटींच्या ठेवी उपलब्ध होत्या. त्यातील आतापर्यंत ११० कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, मार्चपर्यंत विद्यापीठाच्या तिजोरीत १५ कोटींची रक्कम ‘सामान्य निधी’च्या स्वरूपात होती. ती आता शून्यावर जाऊन पोहचली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार मुदत ठेवी मोडण्याचे अधिकार कुलगुरूंना असले तरी मुदत ठेवी मोडल्याने विद्यापीठाचे आर्थिक नुकसान होत असेल तर ते कितपत योग्य आहे हेही तपासण्याची गरज आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी हे सगळं प्रकरण उजेडात आणलं आहे.