प्राजक्ता पोळ, हिंगोली 31 मार्च : विरोधकांची संघर्ष यात्रा तिसऱ्या दिवशी विदर्भातून आता मराठवाड्यात येऊन पोहचलीये. सुरुवातीला या संघर्ष यात्रेवर जोरदार टीका झाली पण गावांगावात आमच्या व्यथा ऐकणारं कोणीतरी येतंय, यामुळे आमच्या पदरात काहीतरी पडेल अशी आशा पुन्हा शेतकऱ्यांना वाटू लागलीये. वेळ साधारण दुपारी १२.३० वाजताची .. बाहेरचं तापमान साधारण ४१ डिग्री सेल्सियस… शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच ही घोषणा कानी पडते. रखरखत्या ऊन्हातही आपल्याला काही मदत मिळेल या आशेवर शेतकरी विरोधकांच्या सभांना गर्दी करतात. डोक्यावरचं कर्ज, शेतमालाला न मिळणारा भाव, जगण्याचे अनेक प्रश्न आहेत. त्यातून आलेला संताप आता लपून राहत नाही. आम्हाला कर्जमाफी नको पण शेतमालाला भाव द्या. गोण्या नाहीत म्हणून नाफेडची खरेदी बंद आहे. त्यामुळे ५ हजार ५० रूपये हमीभाव असलेली तूर व्यापाऱ्यांना ३ ते ३५०० हजार रूपयांनी विकावी लागते. सरकारला प्रत्यक्ष परिस्थिती माहिती असूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या संघर्ष यात्रेतून शेतकऱ्यांचा संताप समोर येतोय. पण विरोधक असो किंवा सत्ताधारी आता शेतकऱ्यांना आश्वासनं नको तर मदतीचा हात पाहिजे.