मुंबई, 7 जानेवारी : मागच्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत केलेल्या विधानांमुळे अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोश्यारींच्या या वक्तव्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. ‘राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?’, असा सवाल अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
याच कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आणखी एक वक्तव्य केलं, त्यामुळे त्यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागले आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या. राज्यपाल बनणं म्हणजे सर्व दु:खच दु:ख आहे, सुख काहीच नाही, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. ‘राज्यपाल बनने से दुख ही दुख है, सुख तो कुछ भी नहीं है. मात्र अशी लोकं येतात तेव्हा कधी कधी बरं वाटतं. मी आता 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे मी तर काही आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. अशा लोकांजवळ येतो तेव्हा त्यांचा सुगंधही लागतो. जैन तीर्थ सर्कीट बनवलंय. सरकारला आवाहन आहे, पर्यटन मंत्रायलासोबतच तीर्थक्षेत्राचं मंत्रालयही व्हावं. सर्वच मुमूक्षू, मुनी राज्यपाल बनू शकत नाहीत,’ असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.