08 मे : तूर उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. राज्यातली तूर खरेदीची मुदत आता 31 मे पर्यंत वाढवण्यात आलीये. राज्यात विक्रमी तूर उत्पादनामुळे अभुतपूर्व तूर कोंडी उभी राहिली होती. नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. अखेर 22 एप्रिलपर्यंत नाफेड केंद्रावर नोंद झालेली तूर खरेदी करण्याचा मार्ग काढण्यात आला. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांकडे असलेली तूर कोण खरेदी करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. 31 मेपर्यंत तूर खरेदी केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीये. या काळात सरकार अतिरिक्त एक लाख टन तूर खरेदी करणार आहे. शिवाय त्यानंतरही तूर शिल्लक राहिल्यास आणखी एक लाख टन तूर खरेदीसाठी तत्वत: मान्यता देण्यात आलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी) केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी तूरखरेदीबाबत केंद्राला विनंती केली ही विनंती मान्य करण्यात आलीये.