अंबरनाथ, 4 मे : राज्य सरकारनी काही भागांमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर मद्यपींच्या झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असला तरीही कोरोनाच्या संकटकाळातही लोकांनी कहर केला. अनेक ठिकाणी मोठी गर्दी जमल्याने सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये तर नागरिकांनी गर्दी केलीच, पण अंबरनाथमध्येही दारूसाठी उतावीळ झालेल्या लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या. अंबरनाथमधील एका वाईन शॉपसमोर इतकी गर्दी झाली की अवघ्या 20 मिनिटात वाईन शॉप बंद करावे लागले. दुसरीकडे, मुंबईतील माटुंगा परिसरात एका वाईन शाॅपसमोरही नागरिकांनी रांग लावून सकाळपासून गर्दी केली होती. मात्र दुकान उघडण्याच्या आधीच इतकी मोठी रांग लावल्याने पोलीस तिथं आले आणि लोकांना हाकलून लावले. तसंच वाईन शॉपही उघडून दिले नाही.
दरम्यान, राज्य सरकारच्या वाईन शॉप उघडण्याच्या निर्णयामुळे राज्यभर सर्व वाईन शॉपच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकच गर्दी केलेली आहे. या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांवर तीही गर्दी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आलेली आहे. पोलिसांनी स्पीकर वरून अनाउन्समेंट सुरू केला असून जिल्हा प्रशासनाकडून जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत दुकान उघडली जाणार नाहीत, असे आवाहन नागरिकांना केले जात आहे. या आवाहनानंतर सुद्धा खरेदीसाठी गर्दी करणाऱ्यांवर लाठीचा प्रसाद देण्यात येईल असं पोलिसांनी स्पीकरवरून सांगितलं आहे. मागील अनेक दिवसांपासून मद्यविक्री बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये खरेदीसाठी चढाओढ लागली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाचा आदेश नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झालेला आहे. संपादन - अक्षय शितोळे