हे वादळ धडकल्यानंतर राज्यावरही याचे परिणाम जाणवणार आहे. महाराष्ट्रात पुढच्या 3ते 4 दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, 16 मे: सध्या अरबी समुद्रात तौत्के चक्रीवादाळाचं संकट घोंघावत आहे. हे चक्रीवादळ आता हळूहळू उग्र रुप धारण करत त्यानं आपली दिशा बदलली आहे. आता हे वादळ मुंबईला भेदून गुजरातच्या दिशेनं आगेकूच करणार आहे. सध्या हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकलं असून मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उर्वरित कोकणातील नागरिकांसाठी धोका वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर आज दुपारी मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. काल रात्री मुंबई-पुण्यासह संपूर्ण कोकण पट्ट्याला वादळी पावसानं झोडपलं आहे. तर अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहे, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. आज पुन्हा मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मागील काही तासांपासून याठिकाणी जोरदार पावसासह वाऱ्याचा वेग वाढला आहे. तौत्के चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर याठिकाणी कोरोना लसीकरण देखील बंद आहे. रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्यातील तौत्के वादळाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यातल आला आहे. तौत्के चक्रीवादळाचं केंद्र हे गोवा किनापट्टीपासून 100 किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. त्यामुळे गोव्यासह सिंधुदुर्गाला वादळाचा आणि समुद्री लाटांचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हे ही वाचा- Cyclone Tauktae: तौत्के वादळामुळे मुंबई-पुणे परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस हे वादळ सध्या मुंबईपासून 200 किमी अंतरावर आहे. हे वादळ सध्या 11 किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे पुढील एक दोन दिवसांत हे वादळ मुंबईत दाखल होईल. असं असलं तरी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसांची शक्यता आहे. तर रायगडला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये आज आणि उद्या वेगवान वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.