रोहिदास गाडगे, राजगुरुनगर-पुणे 17 एप्रिल : खेड तालुक्यातील भीमाशंकर भोरगिरी परिसर सध्या डोंगराची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांनी सजून गेला आहे. डोंगर रानात आदिवासी लोक आपल्या पोटासाठी उन्हात दिवसभर फिरुन करवंदाची तोडणी करतात.याच करवंदाचा स्वाद पर्यटक सुध्दा मोठ्या आनंदाने घेताना दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. अशा उष्म्यात मनाला गारवा देणारी करवंदं खायची संधी मिळते ती भिमाशंकरच्या सह्याद्री डोंगररांगेत, या भागात मोठ्या प्रमाणात करवंदांच्या जाळ्या पहायला मिळतात. थंडगार असलेली करवंदं खायला सुध्दा चविष्ठ असून ती खाल्ल्यानंतर मनाला गारवा मिळतो. उन्हाळ्यात दिसणारी ही करवंदं आता मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल व्ह्याला सुरूवात झाली आहे. बेरी वर्गीय असलेलं हे फळ आरोग्यासाठीही चांगलं असतं..यामधील अनेक घटकं रोगप्रतिबंधाचं काम करतात. करवंद हे नाशवंत फळ असल्यानं जास्त काळ टिकत नाही, मात्र कच्च्या करवंदांचं लोणचं किंवा पिकलेल्या करवंदांचा मुरंब्बा केला तर मात्र जास्त दिवस टिकतो. त्यामुळे दरवर्षी बारा ज्योतिंलिंग असलेल्या भिमाशंकरला अनेक नागरिक खास करवंदं खाण्यासाठी डोंगररांगेत फिरत असल्याचं पाहायला मिळतं. डोंगरची ही काळी मैना म्हणून ओळखल्या जाणार्या करवंदांचा गोडवा यावर्षी अगदी भरभरून चाखायला मिळाल्यामुळे पर्यटक सुध्दा आनंदीत झालेले पहायला मिळत आहेत.