मुंबई, 11 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमध्ये झालेल्या या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतून महाराष्ट्रातली धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातून युपीएला 30 तर एनडीएला फक्त 18 जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने 48 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. यातल्या भाजपला 23 आणि शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. या सर्व्हेनुसार आज निवडणुका झाल्या तर भाजपला स्वत:च्या जागाही टिकवता येणार नाहीत. शिंदेंच्या बंडामुळे आता भाजपकडे 48 पैकी 37 जागा आहेत. एनडीएलाच बहुमत महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमधल्या (Bihar) सत्तानाट्यानंतरही भाजपला फटका बसेल पण एनडीएलाच बहुमत मिळेल, असं या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. 1 ऑगस्टपर्यंत लोकसभा निवडणुका झाल्या असत्या तर एनडीएला 543 पैकी 307 जागा मिळाल्या असत्या, तर युपीएला 125 आणि इतर पक्षांना 111 जागा मिळाल्या असत्या. बिहारच्या सत्तांतरानंतर मात्र हे चित्र बदललं आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांनी (Nitish Kumar) साथ सोडल्यानंतर भाजपच्या 21 जागा कमी होत आहेत. एनडीएला आज निवडणुका घेतल्या तर 286 आणि युपीएला 146 जागा मिळतील. मुड ऑफ द नेशन जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे सी-व्होटरने 1,22,016 जणांची मतं जाणून घेतल्याचा दावा केला आहे. फेब्रुवारी 2022 ते 9 ऑगस्ट 2022 ही तारीख या सर्व्हेसाठी घेण्यात आली, कारण नितीश कुमार यांनी 9 ऑगस्टला भाजपची साथ सोडली. मोदींनाच पसंती या सर्व्हेमध्ये मत नोंदवणाऱ्यांनी मोदींनाच पसंती दिली आहे. 53 टक्के जणांनी पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर 9 टक्के जणांना राहुल गांधी पुढचे पंतप्रधान वाटत आहेत. केजरीवालांना 6 टक्के, योगी आदित्यनाथ यांना 5 टक्के आणि अमित शाह यांना 3 टक्के जणांनी पसंती दिली आहे.