प्रातिनिधिक फोटो
अमरावती, 11 मे : कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह संपूर्ण देश सध्या चिंतेत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येऊन इतर व्यक्तींना त्याची बाधा होवू नये म्हणून विलगीकरण करण्यात येत आहे. मात्र अशातच अमरावती जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. महसूल उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र् शासनाने सुरू केलेल्या मद्य विक्रीचा परिणाम अमरावतीत पहिल्याच दिवशी समोर आला. दारूच्या नशेत पोलीस पाटलाने गावातील विलगीकरण कक्षात जाऊन महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.अमरावतीच्या वडगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस पाटील रणजित गजबे याने विलगीकरण कक्षात जाऊन महिलेस अश्लील शिवीगाळ करीत शरीर सुखाची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्यास उपाशी ठेवण्याची धमकी सुद्धा या पोलीस पाटलाने दिली होती. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने आरडा-ओरड करून पळ काढत थेट चांदूर रेल्वे पोलीस स्थानक गाठलं. चांदूर इथं पीडित महिलेनं तक्रार दाखल केली आहे. या महिलेच्या तक्रारीवरून चांदूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसंच पोलीस पाटलास अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेनं आसपासच्या परिसरात चांगलीच खळबळ उडाली. अमरावतीत काय आहे कोरोनाची स्थिती? कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यानंतर काही काळा अमरावती जिल्हा कोरोनापासून दूर होता. मात्र आता जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असून बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. संंपादन - अक्षय शितोळे