अहमदनगर, 14 नोव्हेंबर : सापांना पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडते. मुलींच्या मनात तर सापांची प्रचंड भीती असते. साप पाहताच अंगावर काटा येतो. अशात नगरमध्ये एक सर्पमैत्रीण आहे जिला सापांबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. कितीही मोठा साप असो तिला सापांची अजिबात भीती वाटत नाही. सापांना वाचवण्यासाठी ही मैत्रीण गेल्या चार वर्षांपासून काम करीत आहे. जिल्ह्यातील ती एकमात्र सर्पमैत्रीण आहे. साप म्हटलं की आपण म्हणतो बाप रे, सापाला अनेकजण घाबरतात, सापाला पाहून सर्वसामान्य लोकांना तो विषारी की बिन विषारी याचा अंदाज नसतो. त्यामुळे आधी त्याला मारतात, कारण साप चावला तर? अशी मनात भीती असते. सापांना वाचवण्यासाठी सर्पमित्र सापांना पकडतात. मानवी वस्तीतून पकडून सापांना हरित अधिवासात सोडले जाते. साप हा आपल्या जैवविविधता साखळीतील महत्त्वाचा एक जीव आहे. यामुळे कुठेही साप निघला तर सापाला घाबरून मारण्यापेक्षा आधी सर्पमित्राला फोन करणे आवश्यक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्पमैत्रीण शीतल कासारने आतापर्यंत अनेक सापांना पकडून जंगलामध्ये सोडले आहे. मानवी वस्तीतील, शेतातील सापांना शीतल रेस्क्यू करते. नगर तालुक्यातील वाळकी इथल्या खेड्यात शीतलचा जन्म झाला. तिच्या शेतामध्ये नेहमी साप निघायचे, साप निघाल्यानंतर तो साप मारून टाकणं हा एकच पर्याय तिथला शेतकऱ्यांकडे उभा असायचा, आपल्या कुटुंबाला तो साप कुठली इजा पोहोचवू नये यासाठी ते सापाला मारत. तेव्हा शीतलला वाईट वाटत असे. Video : हलाखीच्या परिस्थितीतून भावनाची भरारी, संसार सांभाळत उभारला व्यवसाय संगीत सोडून सापांना जीवदान प्राण्यांविषयी अगदी लहान वयापासूनच शीतलला प्रेम होते. यातूनच साप पकडण्याची आवड निर्माण झाली. आवडीतून शीतलने सापांबद्दलचे शिक्षण घेतलं. यासह शीतलने पाच वर्ष संगीत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे गाण्याची देखील विशेष आवड आहे. गाण्यांमध्ये करिअर करायचं असं सुरुवातीला ठरवलं. मात्र, साप पकडण्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालं. यातून सापांना रेस्क्यू करायचं आणि जीवनदान द्यायचं पक्क केलं होत. जिल्ह्यातील पहिली सर्पमैत्रीण गेल्या ४ वर्षापासून शीतल सापांना रेस्क्यू करण्याचे काम करत आहे. सर्व प्रकारचे विषारी, बिनविषारी साप शीतल अगदी न घाबरता पकडते. शीतलचा स्वभाव धाडसी असल्यामुळे ती कुठल्याही गोष्टीला कधीही घाबरत नव्हती. याचाच फायदा तिला साप पकडण्याचा ट्रेनिंगमध्ये झाला आणि सापांना रेस्क्यू करण्याचे शिक्षण अगदी सहज अवगत केलं. आज नगर जिल्ह्यातील पहिली सर्प मैत्रीण म्हणून शीतलची सर्वत्र ओळख आहे. कुटुंबाचे सहकार्य साप रेस्क्यू करण्यात शीतल अगदी पटाईत झाली आहेत. तरीही रेस्क्यू करताना ती विशेष काळजी घेते. सापांना पकडण्यासाठी स्टिक, शूज, मोजे असे साहित्य वापरले जाते. साप पर्यावरणासाठी किती पूरक आहेत. त्यांच असणं किती महत्त्वाचा आहे यावर जनजागृती देखील करते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शीतल सापांबद्दल माहिती देते. शीतलच्या या कामाबद्दल तिचं कुटुंब चांगल्या प्रकारे सहकार्य करते. मदतीला नेहमी तिचा भाऊ अमोल कासार सोबत असतो. आई वडील देखील आपल्या मुलीचे धाडसाचं काम पाहून कौतुकाने भारावून जातात.