सत्यजीत तांबेंना शुभांगी पाटलांचं आव्हान
tambeनेवासा, 22 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आमदार सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला आहे. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केली आहे. दोन्हीही उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून परिसरातील प्रत्येक कार्यक्रमाला ते हजेरी लावत आहेत. नेवासा तालुक्यातील एका विवाहप्रसंगी हे दोन्ही उमेदवार आज समोरासमोर आलेले पाहायला मिळाले. त्यांचा हा व्हिडीओ आता समोर आला आहे. फक्त नजरानजर.. नेवासा तालुक्यातील सोनई येथे गडाख आणि घुले यांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे सुद्धा लग्न सोहळ्याला उपस्थित होते. ते बाहेर पडताना त्यांच्या विरोधी उमेदवार शुभांगी पाटील तेथे आल्या. मात्र, दोघेही एकमेकांकडे न पाहता पुढे निघून गेले.
शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना अखेर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. यापूर्वी पाटील यांच्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली होती. सुभाष जंगले नगर जिल्ह्यातून येतात नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. एक लाख मतदारांची नोंदणी केल्याचं शुभांगी पाटील खोटं बोलत आहेत. सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. जंगले यांनी देखील मला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल म्हणून दावा केला होता. मात्र, आता शुभांगी पाटील यांना पाठिंबा मिळाला आहे.
सत्यजित तांबे यांनाच काँग्रेसने पाठिंबा द्यावा.. दुसरीकडे बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनाच काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी मागणी नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे यांनी ही मागणी केली आहे. काही तांत्रिक कारणामुळे हा घोळ झाला आहे, त्यामुळे तांबे कुटुंबांच्या पाठीशी काँग्रेसने राहावे, अशी मागणी त्यांनी केलीय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आम्ही सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी मागणी करणार असल्याचेही दिवे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणूक माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. सत्यजित तांबे प्रचारात व्यस्त असून ते आपल्या संगमनेर शहरातच आहेत. संगमनेरातील निवासस्थानातून बाहेर पडले तरी प्रसार माध्यमांशी बोलण्यास मात्र नकार दिला आहे. कुठे जाणार, कुणाला भेटणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.