प्रातिनिधिक फोटो
साहेबराव कोकणे, अहमदनगर, 19 जानेवारी : मराठी विषयाच्या संगणक टंकलेखन परीक्षेत नगरमध्ये डमी विद्यार्थी बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसंच पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. राज्य संगणक टंक लेखनाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यानुसार नगरच्या नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनीरिंग या कॉलेजच्या केंद्रावर मराठी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू होती. या परीक्षा केंद्रावर संचालक म्हणून जयश्री कारले आहेत. परीक्षा हॉलमध्ये काही विद्यार्थी संशयास्पद हालचाली करत होते. त्यावेळी जयश्री कार्ले यांनी या विद्यार्थ्याचे ओळखपत्र तपासले. त्याच बरोबर स्वाक्षरी पट देखील तपासला. तपासणीनंतर चार विद्यार्थी हे परीक्षेला डमी आढळले. त्यावर जयश्री कार्ले यांनी विद्यार्थ्यांना विचारणा केल्यावर विद्यार्थ्यांनी त्यांना अरेरावीची भाषा वापरली. त्यानंतर परीक्षा केंद्रावर गोंधळ सुरू झाला. यामुळे इतर मुलांना परीक्षा देण्यास उशीर झाला. जयश्री कार्ले यांनी हा प्रकार वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळवला. त्यानंतर परीक्षा केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आला. पोलिसांनी या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. धक्कादायक! अकरावीच्या विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्येच दिला मुलाला जन्म ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी केली. तिथे या विद्यार्थ्यांनी दुसऱ्याच्या ओळखपत्रावर डमी म्हणून परीक्षेला बसलो असल्याचं कबूल केलं. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणांमध्ये संतोष मारुती सुळे, आदिनाथ नामदेव सोलर, युवराज रामदास सुळे, मयूर चंद्रकांत डोके, मोरेश्वर दिलीप गीते, तेजस जालिंदर बोरुडे, प्रवीण अर्जुन गाडेकर, यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील संतोष चौरे, आदिनाथ सोलट, नवनाथ सोलट, युवराज सुळे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.