सातारा, 2 फेब्रुवारी : जालना जिल्ह्यातील गोंदेगाव येथे प्रेमी युगुलाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत 5 आरोपींना अटक केली. महाराष्ट्राला मान शरमेनं खाली घालवणाऱ्या या घटनेवर अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘जालन्यामध्ये प्रेमी युगुलाला झालेली मारहाण आपल्याला योग्य वाटते का,’ असा प्रश्न एका कार्यक्रमादरम्यान रिंकू राजगुरू हिला विचारण्यात आला होता. त्यावर रिंकू म्हणाली की, ‘हे योग्य नाही. खरंतर मीदेखील इतकी मोठी नाही या प्रश्नाला उत्तर द्यायला, पण आपण आत्ता ज्या पद्धतीने घडलेला प्रकार सांगितला ते ऐकून कोणालाही ते योग्य वाटणार नाही.’ दरम्यान, गोंदेगाव शिवारात एका प्रेमी युगुलाला गावातील एका टोळक्याने मारहाण करीत मुलीशी अश्लील वर्तन केलं होतं. याप्रकरणी नंतर पोलिसांनी कारवाई केली. मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 मुख्य आरोपींना अटक केली आहे. माथेफिरू टोळक्याने प्रेमी युगुलाला मारहाण करत त्याप्रकाराची मोबाईलमध्ये व्हिडिओ रिकॉर्डिंग करून तो विडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला होता. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात असताना पोलीस मात्र याप्रकरणी कमालीचे अनभिज्ञ असल्याचं भयानक वास्तव समोर आलं होतं. ‘न्यूज 18 लोकमत’ने बातमीच्या माध्यमातून याप्रकरणाचा सतत पाठपुरावा केल्यानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवली. याप्रकरणी पाचही मुख्य आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.