पुणे-नगर महामार्गावर शिरूरजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या कंटनेरवर कार आदळून भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये 20 दिवसांच्या बाळाचा समावेश आहे. किशोर हाके (वय-32), शुभम हाके (वय-25) विमल माधव अशी मृतांची नावं आहेत. या अपघातात पुष्पा हाके गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रविवारी (21 एप्रिल) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
किशोर हाके यांना 20 दिवसांपूर्वीच मुलगा झाला होता. पत्नी आणि मुलाला आपल्या घरी आणण्यासाठी ते औरंगाबादेत भाऊ आणि आईसह गेले होते. प्रवासादरम्यान काळानं त्यांच्यावर घाला घातला.
औरंगाबादहून रात्री कारने पुन्हा वाघोलीच्या दिशेनं निघाल्यानंतर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार शिरूर बायपास पाचर्णेमळा येथील पुलाजवळ पोहोचली. यावेळेस पुलावर रस्त्याच्या कडेला बंद असलेल्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या त्यांच्या कारची जोरदार धडक बसली.
हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तसंच अपघाताचा आवाज जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.
अपघातात कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. दरम्यान, शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.