आधीपासून इतर आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे. त्यामुळे Asthma रुग्णांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
ज्या रुग्णांना आधीपासून कोणता ना कोणता आजार आहे, अशा रुग्णांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे. त्यामुळे अस्थमा रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आरोग्य म्हटलं की आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. आहारात अशा पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे अस्थमा अटॅक येण्याची शक्यता कमी होईल.
हिरव्या पालेभाज्या - फुफ्फुसांसाठी हिरव्या पालेभाज्या खूप फायदेशीर आहेत. पालेभाज्या खाल्ल्यानं फुफ्फुसात कफ जमा होत नाही आणि अस्थमा रुग्णांना अटॅक येण्याची शक्यताही कमी होते. हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनानं आतडे आणि फुफ्फुसांचं कार्य सुरळीत राहतं.
व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ - अशा पदार्थांमध्ये अँटि-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं, जे फुफ्फुसाला सुरक्षा देतं. एका अभ्यासानुसार जे लोक व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ खातात, त्यांना अस्थमा अटॅक येण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे संत्रं, ब्रोकोली, किवी या फळांचं सेवन करावं.
मध आणि दालचिनी - अस्थमा रुग्णांनी मध आणि दालचिनीचं सेवन करणं फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी दालचिनी पावडर आणि मध एकत्र मिसळून खा, यामुळे फुफ्फुसाला आराम मिळतो.
तुळस - तुळशीत अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुळशीची पानं टाकलेला चहा प्या. यामुळे अस्थमा असलेल्या रुग्णांमध्ये अटॅकची शक्यता कमी होते. शिवाय तुळस रोगप्रतिकारक प्रणालीही मजबूत करते.
सफरचंद - जी लोकं नियमित सफरचंदाचं सेवन करतात, त्यांना अस्थमाचा अटॅक येण्याची शक्यता कमी असते. सफरचंदामध्ये फ्लॅवोनाइड असतं, जे फुफ्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करतं.
कॉफी आणि ब्लॅक टी - कॅफिने एकप्रकारचं ब्रॉन्कोलाइटर आहे, जे फुफ्फुसातील ऑक्सिजनची पातळी वाढवतं. कॉफी आणि ब्लॅक टीमुळे शरीरात ऊर्जाही वाढते.
सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांशी संपर्क जरूर साधावा.