नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : सिगारेट ओढणं (Cigarette smoking) आरोग्यासाठी किती घातक आहे, हे कोणाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. या चुकीच्या सवयींमुळे फक्त कॅन्सरच (Cancer) होऊ शकतो असं नाही तर शरीरात विविध गुंतागुंतीच्या समस्याही उद्भवू शकतात. सिगारेट ओढणं आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे आणि ज्यांना याचे व्यसन लागले आहे, अशा लोकांना त्यापासून दूर राहण्यासाठी खूप वेळ लागतो.
सिगारेटमध्ये निकोटीन असतं; ज्याचा शरीरावरील प्रभाव फक्त 40 मिनिटं टिकतो. हा प्रभाव कमी होताच, व्यक्तीला पुन्हा सिगारेट ओढण्याची इच्छा होते. या दुष्टचक्रात माणसाला कधी व्यसन जडतं, हे समजतही नाही.
सिगारेट किंवा तंबाखू सोडण्याचा तुमचा निश्चय असेल, तर सुरुवातीला दूध पिण्याची सवय लावा. दुधामुळं तुमची सिगारेट ओढण्याची इच्छा कमी होण्यास मदत होते. जेव्हा जेव्हा तुम्हाला सिगारेट ओढण्याची इच्छा होईल तेव्हा एक कप दूध प्या. मग काही काळ काही घ्यायची गरज भासणार नाही.
तुम्ही संत्री, मोसंबी, केळी, पेरू, किवी, मनुका, स्ट्रॉबेरी आदी व्हिटॅमिन 'सी'नं समृद्ध असलेली फळंदेखील घेऊ शकता. त्यांच्यामुळंही तुमची सिगारेट ओढण्याची इच्छा दूर होईल. शिवाय, ही फळं शरीरासाठी फायदेशीर असतात.
कच्चं पनीर आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर मानलं जातं आणि ते खाल्ल्यानं जास्त वेळ भूक लागत नाही किंवा दुसरे काही खावंसं वाटत नाही. तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला तंबाखू किंवा सिगारेट घ्यावीशी वाटेल, तेव्हा कच्च्या पनीरचे काही स्लाईस खा. यामुळं सिगारेटची तल्लफ संपेल.
ज्यांना तंबाखू चावून खाण्याची सवय आहे, त्यांनी बडीशेप खाण्याची सवय लावावी. जेव्हा जेव्हा तुम्हाला तंबाखू खावीशी वाटते, तेव्हा पर्याय म्हणून बडीशेप खा. यामुळं तुमचं पचन चांगलं राहतं आणि तुमचं व्यसनही दूर होण्यास मदत होते.