मुंबई, 19 मार्च : काही वर्षांपूर्वी पहिल्यांदाच मी मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं.. हे गाणं ऐकलं होतं. प्रशांत दामले यांच्या आवाजातील ते गाणं पहिल्यांदा ऐकून त्याचाही इतर गाण्यांप्रमाणे विसर पडेल, असं मला वाटलं. पण, तसं झालं नाही. मुळात माझ्या वाटण्याला सुरुवातीपासून तशीही काही किंमत नव्हती हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं. असो… मी योगिता पाटील… आजपासून माझ्या नोकरीचा शेवटचा महिना सुरु होत आहे. एका नव्या आशेसह पुढे जायचं ठरवलंय खरं. पण, मागे वळून पाहताना आता प्रत्येक वेळी हादरा बसत आहे. मुळात या महिन्याची सुरुवात झालीये ती म्हणजे माझ्या कामाच्या बदललेल्या वेळेपासून. सकाळी सूर्यदेवाच्या दर्शनानेच मी डेस्कवर बसणं साहेबांना अपेक्षित असल्यामुळे आजपासून मी सकाळच्या वेळेत आहे. रोज चौथ्या सीटसाठी ट्रेनमध्ये गेल्यावर आटापीटा करणारी मी जेव्हा आज सकाळी सहाच्या ठोक्याला ट्रेन पकडली तेव्हा भसकन रिकाम्या व्यासपीठावर चुकून एखादा कलाकार येतो ना तसंच मला वाटलं. अख्खा डबा रिकामा होता. कोपऱ्यात दोन मुली बसल्या होत्या. बसल्या नव्हे झोपल्या होत्या खरंतर. -——————————————————————————————————————————————————— Life In लोकल : मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज… कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
माझ्याच्याने इतक्या साऱ्या रिकाम्या सीट पाहून हसूच आवरलं नाही. मुख्य म्हणजे बसण्याची इच्छा मात्र झालीच नाही. मी आपली ट्रेनच्या दारावरच उभी राहिले. मागे जाणारी वाट पाहत…. दूर होणारा अंधार पाहत आणि तपकिरी रंगाची उधळण करणाऱ्या निसर्गाला पाहत. हे सारंकाही माझ्यासाठी खूप नवं आणि सुखद होतं. शांत वातावरण, गर्दी नाही, कोणाची धक्काबुक्की नाही, कुठे उतरणार या प्रश्नाला वारंवार उत्तर देणं नाही आणि ती भांडणं नाहीच नाही. निदान एक महिना तरी ही दगदग होणार नव्हती. पण, खरंच मला या दगदगीचा त्रास होत होता? रेल्वेच्या डब्यात चढल्यानंतर चौथ्या सीटसाठी उभं राहणंच मला जास्त आवडू लागलं होतं. सवय लागली होती म्हणालात तरी चालेल. इथे गर्दीत भांडणं व्हायची हे खरं असलं तरीही आम्हा अनेकजणींची मनं जोडली गेली होती. एक दिवस कोण एक मैत्रीण भले तिचं नाव आम्हाला माहित नसेलही ती दिसली नाही तर ती का नाही दिसत बुवा, असा प्रश्न मनात डोकावतो. कोणा फेरीवालीची फेरी झाली नाही किंवा एखाद्या फेरीवालीच्या तिच्या बाळाला बरं नसलं तरीही त्या रोजच्या मंत्रालयातल्या काकू तिला सल्ले द्यायच्या. त्यांच्याकडे पाहून किती काळजी असते ना लोकांना…. असंच वाटत राहायचं. आम्ही बायका चर्चा करण्यातही तितक्याच तरबेज आहोत बरं… सेक्रेड गेम्समधल्या कुक्कूपासून दीपिका रणवीरच्या लग्नाची जबाबदारीच जणू या प्रवासातील महिलांनी घेतलेली असते. असंख्य चेहरे, असंख्य चिंता, प्रश्न, काही निरुत्तरित तर काही अर्धवट. त्यातूनही मनाची होणारी घालमेल काही वेगळी नाही. पण, आता मात्र हे सगळं नसणार होतं. इथे फक्त कामाच्या वेळा नव्हत्या बदलल्या. तर बदलल्या होत्या माझ्या मनाच्या दिशा. ज्या फोर्थ सीटने मला नकार पचवायला शिकवलं तिच फोर्थ सीट माझ्यासाठी खऱ्या अर्थाने सुख होती. काही बाबतीत हे मी नाकारुच शकत नाही… त्यामुळे सुख म्हणजे फोर्थ सीट… - मधुरा नेरुरकर Madhura.Nerurkar@nw18.com