मुंबई, २२ एप्रिल- मी मयुरेश राणे.. माझ्यासोबतचा ट्रेनमधला एक असा किस्सा तुम्हाला सांगणार आहे की तो ऐकल्यावर आपण हसावं की रडावं हाच प्रश्न तुम्हाला पडेल. नेहमीप्रमाणे मी करी रोडवरून ठाण्याला जाण्यासाठी ट्रेन पकडली. ऑफिसवरून निघायला रात्रच झाली होती, त्यामुळे ट्रेनमध्ये फारशी गर्दीही नव्हती. प्रत्येकजण निवांत जागेवर बसले होते. काहीजण डुलक्या काढत होते तर काही मोबाइलमध्ये डोकं घुसवून बसले होते. मी मिडल डब्यात चढलो होतो. माझ्या बाजूचा डबा महिलांचा होता. कुर्ला स्टेशनला गाडी थांबली. तशी थोडी ट्रेनमध्ये माणसं चढली. पण अचानक बाजूच्या डब्यातून दोन तीन महिलांच्या ओरडण्याचा आवाज यायला लागला. माझी त्या डब्याकडे पाठ होती. पण आवाज कानावर पडल्यावर नक्की काय गोंधळ सुरू आहे हे पाहण्याासाठी मागे वळलो तर दोन तीन बायका सत्तरी पार केलेल्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर ओरडत होत्या. त्याचं झालं असं की ते आजोबा चुकून महिलांच्या डब्यात चढले. शिवाय ते चढून उतरेपर्यंत ट्रेन सुरू झाली होती. मग काय बायकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या सगळ्यात काठी घेऊन थरथर कापणाऱ्या त्या आजोबांनाही कळलं नाही नक्की काय सुरू आहे. त्या महिला म्हाताऱ्या माणसाला एवढ्या बोलत होत्या आणि आरडा ओरड करत होत्या की त्यातल्या एकीने तर चक्क ट्रेनची चेन ओढली. मग काय गाडी थांबली हे सगळं कुर्ला आणि विद्याविहारच्या मध्ये झालं. तोवर तिकडे रेल्वे पोलीस आले आणि त्यांनी त्या आजोबांना ट्रेनमधून उतरायला सांगितलं. स्टेशन आलं नसतानाही त्यांना रात्रीच्यावेळी ट्रेनमधून उतरवून बाजूच्या आमच्या डब्यात चढवणं हा पोलिसांसाठी वेगळाच टास्क होता. या सगळ्यात ट्रेन ३० ते ३५ मिनिटं उशीराने सुरू झाली. मला हे मान्य आहे की महिलांच्या डब्यात पुरुषांनी चढूच नये. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच ना.. चुकून चढलेले ते आजोबा नंतरचं स्टेशन येईपर्यंत थांबले असते त्या डब्यात तर काय झालं असतं. ज्यांना स्वतःचा तोलही सांभाळता येत नाही ते डब्यातील पाच- सहा महिलांना काय त्रास देणार होते… एवढी कसली असुरक्षितता की दोन मिनिटांच्या फरकासाठी त्या पाच महिलांनी इतर १०० जणांना अर्ध्या तास ताटकळत ठेवलं. त्या आजोबांची अवस्था पाहून तिथल्या सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. पण त्या महिलांसमोर तरी काय बोलणार. नियम, वेळ या सगळ्या गोष्टी माणसांसाठी तयार केलेल्या आहेत. पण त्यात माणुसकीच नसेल तर या सगळ्याचा काही उपयोग तरी आहे का हा प्रश्न मला पडला आहे. -मधुरा नेरुरकर