प्रत्यक्षात आयपीएलचे (IPL 2021) सामने पाहायचे असतील तर तुम्हाला लस घ्यावीच लागेल.
आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021, Phase 2) 19 तारखेपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. आता क्रिकेट फॅन्सना स्टेडियममध्ये उपस्थित राहून मॅचचा आनंद घेता येणार आहे. बीसीसीआयनं ही घोषणा केली आहे.
यापूर्वी कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून त्यांचे आवडते खेळाडू तसंच टीमला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना कोव्हिड प्रोटोकॉल आणि यूएई सरकारचे नियम पाळण्याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यानुसार तुम्हाला कोरोना लस घ्यावी लागणार आहे.
यूएई सरकारने भारतासह 15 देशांवरील आपल्या देशातील ट्रॅव्हल बॅन हटवला आहे. आता या देशातल्या नागरिकांना यूएईमध्ये जाता येणार आहे. पण त्यासाठी WHO ने मंजुरी दिलेली लस घेणं बंधनकारक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळालेली आणि सध्या भारतात दिली जाणारी लस आहे ती म्हणजे कोविशिल्ड लस. जी ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाची आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची यात भागीदारी आहे.
त्यामुळे तुम्हाला जर यूएईमध्ये जाऊन प्रत्यक्षात आयपीएलचा सामना पाहायचा असेल तर तुम्ही कोविशिल्डचे दोन्ही डोस घेणं गरजेचं आहे.