देशभरात 9 मार्चला होळी (Holi) आणि 10 मार्चला धूलिवंदन आहे. मात्र मथुरा, वृंदावनमध्ये आठवडाभर आधीच हा उत्सव सुरू होतो, जो संपूर्ण आठवडा सुरू असतो.
मथुरा-वृंदावनात फुलांची होळी - ही होळी जगभरात प्रसिद्ध आहे. फाल्गुन एकादशीला वृंदावनात फुलांची होळी खेळली जाते. बांके बिहारी मंदिरात ही होळी असते. मंदिराचं दार उघडताच मंदिराचे पुजारी भक्तांवर पुष्पवर्षा करतात. त्यानंतर इतर मंदिरांमध्ये या होळीचं आयोजन होतं.
बरसानामधील लठमार होळी - लठ म्हणजे काठीने खेळली जाणारी ही होळीदेखील प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणाहून लोकं इथं ही होळी खेळण्यासाठी येतात. या होळीच्या सुरुवात मुख्य होळीच्या आठवडाभर आधी होते. त्यानंतर दुसऱ्यादिवशी नंदगावमध्येदेखील अशीच होळी खेळली जाते. लठमार होळीच्या 2 दिवस आधी बरसानामध्ये लाडू होळी खेळली जाते. यावेळी लोकं एकमेकांवर लाडू फेकतात.
पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतमधील होळी – इथं होळी वसंत उत्सव नावाने ओळखली जाते. या उत्सवाची सुरुवात रवींद्रनाथ टागोर यांनी केली होती. शांतिनिकेतनमधील विश्व भारती युनिव्हर्सिटीमध्ये या होळीचं आयोजन केलं दातं. विद्यार्थ्यांमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. विविध रंगांनी होळी खेळली जाते, शिवाय बंगाली पदार्थ आणि मिठाईचा आस्वाद घ्यायला मिळतो.
पुरुलियाची होळी – पश्चिम बंगालमधील आणखी एक प्रसिद्ध होळी. ज्यामध्ये पारंपरिक नृत्य आणि संगीताचं आयोजन केलं जातं. स्थानिक लोकं लोकनृत्य करून पर्यटकांची करमणूक करतात. सोबतच गुलालाचा रंग आणि मिठाईची गोड चव असतेच.
आनंदपूर साहिब, पंजाब – पंजाबी स्टाईलने होळी खेळण्यासाठी उत्तम असं ठिकाण. 1701 साली इथं होळीची सुरुवात झाली. शीख धर्मीय कुश्ती, मार्शल आर्ट्स, तलवारबाजी असा विविध चित्तथरारक कसरती दाखवतात. सोबतच रंगांची होळी खेळली जाते आणि पंजाबी पदार्थांवर ताव मारला जातो.
उदयपूरची रॉयल होळी - होळीच्या पूर्वसंध्येला उदयपूरमध्ये एक विशेष होळी असते, याला शाही किंवा रॉयल होळीही म्हणतात. यावेळी इथं अग्नी पेटवला जातो आणि शाही पद्धतीने होळी साजरी केली जाते. यावेळी शाही निवासापासून मानेक चौकापर्यंत शाही मिरवणूकही काढली जाते. यामध्ये घोडे, हत्ती, रॉयल बँडचा समावेश असतो. नाचगाण्यासह लोकं खूप धम्माल करतात.