योगासनामुळे केवळ शरीरच निरोगी राहतं असं नाही, तर मन आणि मेंदू सुद्धा शांत राहतो.
योगासनामुळे मानवी शरीराला अनेक विविध फायदे होतात. केवळ शरीरच निरोगी राहतं असं नाही तर मन आणि मेंदू सुद्धा शांत ठेवण्यासाठी साहाय्यक ठरतात. मानसिक स्थिरता मिळाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. मानसिक शांतता लाभल्यामुळे राहणीमानात सुद्धा बदल होतो.
वृक्षासन - हे आसन करताना वृक्षाप्रमाऩे उभं रहावं लागत असल्यामुळे या आसनाला वृक्षासन असं म्हणतात. या आसनामुळे मेंदूसह संपूर्ण शरीराला आराम मिळतो. कृती - एका जागेवर ताठ उभे राहा. एक पाय दुमडून दुसऱ्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा. आता हळूहळू श्वास घेत दोन्ही हात वरच्या दिशेने घेत दोन्ही तळहात वर जोडा. नमस्काराची मुद्रा तयार झाल्यानंतर काही वेळ याच स्थितीत थांबून श्वास रोखा आणि त्यावर लक्ष केंद्रीत करा.
सर्वांगासन - उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचं तापमान खूप वाढतं. सर्वांगासन केल्यानेो रक्तप्रवाह मेंदुपर्यंत पोहोचतो. सर्व्हाइकल आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे आसन करु नये. कृती - योग मॅट खाली घालून पाठ टेकून झोपा. दोन्ही पाय गुडघ्यात न दुमडता वर घ्या. कोपर जमिनीला टेकवत हाताने कंबरेला आधार द्या. दोन्ही पाय ताठ करुन 90 अंशाचा कोन बनवा. थोडा वेळ याच अवस्थेत राहा. मग हळूहळू पाय खाली घ्या.
पवनमुक्तासन - पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी पवनमुक्तासन हे सगळ्यात उत्तम आसन आहे. गॅसेसचा त्रास असणाऱ्यांसाठी हे आसन फायदेशीर ठरतं. कंबरदुखी आणि स्लिप डिस्क आणि सायटिकाच्या समस्या दूर करण्यासाठी हे आसन उत्तम आहे. कृती - सगळ्यात आधी पाठीरव झोपा. आता एक पाय दुमडून छातीजवळ आणा. डोकं वर उचलून गुडघ्याला नाक किंवा हनुवटी टेकविण्याचा प्रयत्न करा. जेव्हा नाक किंवा हनुवटी गुडघ्याला टेकवाल तेव्हा पूर्ण श्वास बाहेर सोडा. त्यानंतर हळूहळू पाय सरळ केल्यानंतर हीच क्रिया दुसऱ्या पायानेही करा. दोन्ही पाय एक एक करून झाल्यानंतर एकावेळेस दोन्ही पाय छातीजवळ आणा. पायांना पकडून पाठीच्या सहाय्याने झोका हलवण्याप्रमाणे शरीर हलवा. त्यानंतर लगेच उठण्याची घाई न करता थोडावेळ शांतपणे पडून रहा.