कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी शार्कचा (shark) मोठा प्रमाणात वापर होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जगभरात कोरोनाव्हायरस थैमान सुरू आहे. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी कोरोना लस तयार केली जात आहे. मात्र या लशीमुळे शार्क माशांचे जीव धोक्यात आहे.
कोरोना लशीसाठी शार्क माशांचा बळी जाणार असा इशारा अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील शार्क अलाइज संस्थेने दिला आहे. स्काय न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.
शार्कच्या यकृतात Squalene हे एक प्रकारचं नैसर्गिक तेल आढळतं. अनेक कोरोना लशींमध्ये हा महत्त्वपूर्ण असा घटक असल्याचं सांगितलं जातं आहे. लशीची परिणामकता वाढवण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो आहे.
कोरोना लशीच्या एका डोसची गरज पडल्यास अडीच लाख तर दोन डोसची गरज पडल्यास पाच लाख शार्क मारावे लागतील असा दावा या संस्थेने केला आहे.
तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी जवळपास तीन दशलक्ष शार्क squalene साठी मारले जातात. याचा वापर सौंदर्यप्रसाधन आणि मशीन तेलात केला जातो आणि आता कोरोना महासाथ कधी संपेल माहिती नाही. अशात कोरोना लशीसाठी शार्कचा वापर केल्यास त्यांच्य सुरक्षिततेबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.