कोरोनाच्या महासाथीत यापैकी कोणत्या बदलाला तुम्ही स्वीकारलं आहे.
कोविड-19 महासाथीने जीवनाच्या प्रत्येक अंगाला प्रभावित केलं. आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आले. त्यांना आज ‘न्यू नॉर्मल’ अर्थात नवसामान्य परिस्थिती म्हटलं जातं.
कोविड-19 सारख्या अभूतपूर्व परिस्थितील तोंड देताना लोकांच्या वर्तनातील बदल अर्थात त्यांची वृत्ती, खरेदीच्या सवयी, वैयक्तिक दिनक्रमात कसा बदल झाला याबाबत अभ्यास करण्यात आला.
कोरोना काळात 38.6% लोकांनी आपण अधिक मदतकारक झाल्याचं वाटलं. माणूस समाजाभिमुख असल्याने अशा परिस्थितीत वृत्ती मदतकारक बनणे स्वाभाविक मानले पाहिजे.
याशिवाय 6.4% लोकं सभ्य आणि 18.6% लोकांमध्ये सहानुभूतीशीलता आली. तर कोरोनाने 22.1% लोकांच्या मनात भीतीने घर केलं.
कोविड-19 मुळे अनेकांच्या मनांत भीतीची दहशत, तर वेतन कपात, काम नाही आणि पगार नाही अशी अनेकांची अवस्था बनवली. त्यामुळे गरजांवर सर्वात जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आलं.
जवळपास 58 टक्के लोकांनी त्यांच्या खरेदीच्या सवयी बदलल्या आणि केवळ गरजांवर केंद्रीतच खरेदी केली. केवळ 1.4 टक्के लोकांनी या काळात इच्छांवर केंद्रीत खरेदी केली.
गरज आणि इच्छा या दोहोंचा मिलाफ साधणे 30.3% लोकांना शक्य झाले. तर खरेदीविषयक वर्तनात काहीही बदल झाला नाही अशांचे प्रमाण 10.6% इतकं होतं.
कोविड-19 परिस्थितीने लोकांचा कल स्थानिक वस्तूंच्या खरेदीला पसंती देणारा बनवला. 71.8% लोकांनी त्यांचे खरेदीचे वर्तन स्थानिक पसंतीकडे झुकल्याचे स्पष्ट केलं.
कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान, इतर काही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आणि / किंवा सुलभतेमुळे बऱ्याच जणांनी स्थानिक विक्रेते आणि स्थानिक किराणा आणि वाणसामानाच्या दुकानांना खरेदीसाठी पसंती दिल्याचे दिसून आले.
बर्याच वेळा, लोक पैसे वाचवण्यास सक्षम नसतात. कारण त्यांचे त्यांच्या खर्चावर नियंत्रण नसते. कोविड-19 संकटाने लोकांपुढे त्यांच्या नोकरी / पेशा, तसेच वेतन / मिळकत अशा अनेक प्रकारच्या अनिश्चितता उभ्या केल्या, ज्यामुळे बचतीचे महत्व त्यांच्या लक्षात येऊ शकले.
सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या 68.9 टक्के लोकांनी, कोविड-19 परिस्थितीत त्यांच्या बचतीच्या सवयीत सुधारणा झाल्याचे नमूद केले, तर 7.1 टक्के लोकांनी या परिस्थितीने त्यांच्या बचतीच्या सवयीत बिघाड घडविल्याचे मत नोंदविले.
कोविड -19 परिस्थितीने सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या 55.6% टक्के लोकांना अधिक काम करण्यास प्रवृत्त केल्याचे सांगितले. तर सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या 44 टक्के लोकांचा कोविड-19 परिस्थितीत व्यायामाकडील कल कमी झाला.
25.5 टक्के लोकांनी त्यांची झोप तर 8.5 टक्के लोकांनी त्यांचं खाणं कमी झाल्याचं त्यांनी सांगितले. सोशल मीडियाचा वापर मात्र फार बदलला नाही, तो जवळपास आहे त्या स्थितीतच राहिला.
या काळात नवीन सवयी/ कौशल्य शिकून घेतले असे 64.1% लोकांनी सांगितले. 35.9% लोकांना कोविड-19 परिस्थितीत नवीन सवय जडल्याचे अथवा नवीन काही शिकल्याचे वाटत नाही.
जवळपास 20% लोकांना वाटते की, कोविड-19 मुळे त्यांच्या वर्तनात घडून आलेला बदल हा कायमस्वरूपी आहे, त्या उलट 21% लोकांनी हा बदल तात्पुरता असल्याचे सांगितले. तब्बल 59.2% लोकांना वर्तनातील हा बदल स्थायी स्वरूपाचा की तात्पुरता हे सांगता येऊ शकले नाही.
एकंदरच काय तर जागतिक स्तरावर, कोविड-19 परिस्थितीने अनेक अभूतपूर्व अशा उलथापालथी घडविल्या आहेत. या काळात लोकांचा स्वभाव अधिक मदतकारक बनला आणि ते आपल्या इच्छांपेक्षा नेमक्या गरजा भागवण्यापुरताच विचार करू लागले.
कोविड-19 परिस्थितीत लोकांचा बचतीकडील कल वाढला. या काळाचा त्यांनी नवीन सवयी / कसब-कौशल्य शिकून घेण्यासाठी वापर केला. सर्वेक्षणात जवळपसा 143 लोकांनी आपला प्रतिसाद दिलेला आहे. विविध संशोधनाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या डॉ. अरकेरी शांता व्ही आणि हेल्थकेअर आणि फार्मा कम्युनिकेशनच्या दीप्ती केंजळे खोपकर यांनी विविध संशोधनाचा आधार घेत हा निष्कर्ष मांडला आहे.