नक्षलवाद्यांसाठी (naxalites) पोलिसांनीच लग्नसोहळ्याचं आयोजन केलं होतं.
छत्तीसगडमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या (Valentine’s Day) निमित्ताने एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. दंतेवाडा (Dantewada) पोलिसांनी शरण आलेल्या 15 नक्षलवाद्यांच्या (Naxalite) सामूहिक विवाहसोहळ्याचं आयोजन रविवारी केलं होतं. नक्षलवाद्यांसोबत पोलिसांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. या विवाहसोहळ्यामध्ये पोलीसही वऱ्हाडी म्हणून सहभागी झाले होते. वधू आणि वर अशा दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांना आशीर्वाद दिले.
या सर्व नक्षलवाद्यांनी गेल्या 6 महिन्यांत आत्मसमर्पण केलं होतं. ते शरण आल्यावर त्यांना पुरस्कारदेखील देण्यात आले होते. आता विवाहबंधनात अडकल्यावर तर त्या नक्षलवाद्यांचा खूप आनंद झाला आहे. पोलिसांनी आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाचं खूप कौतुक होत आहे.
दंतेवाड्याचे पोलीस अधीक्षक (SP) अभिषेक पल्लव यांनी सांगितलं, ज्या नक्षलवाद्यांचं लग्न झालं आहे, त्या सर्वांनी गेल्या सहा महिन्यांत आत्मसमर्पण केलं होतं. या विवाहसोहळ्यात त्यांच्या कुटुंबातले सदस्यदेखील उपस्थित होते. सर्व नक्षलवादी मुख्य प्रवाहात यावेत हा आमचा प्रयत्न आहे.'
पोलिसांनीच या विवाहसोहळ्याचं आयोजन केलं होतं. मुख्य प्रवाहात आलेल्या या नक्षलवाद्यांच्या लग्नामध्ये पोलीस आणि अधिकारीही वऱ्हाडी म्हणून, फेटे वगैरे घालून आनंदाने सहभागी झाले होते.
पोलीस अधिकाऱ्यांनीच वधू-वरांकडून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं. त्यानंतर वधूंचं कन्यादान झालं. या विवाहसोहळ्यासाठी कारली हेलिपॅडजवळ एक शानदार मंडप उभारण्यात आला होता.